राज्यभर आज ग्रामपंचायत निकालांची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वच पक्षांकडून या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मनसेनंही कंबर कसली होती. भाजपा, शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. या निकालांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाकित चर्चेत आलं असतानाच त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस अधिवेशनासाठी सध्या नागपूरमध्ये असून सोमवारी नागपूरमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना फडणवीसांनी ग्रामपंचायत निवडणुकांबाबत भाकित केलं. “उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका”, असं फडणवीस म्हणाले होते. यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांना हे आम्ही सांगायला नको”
“ग्रामपंचायत निवडणुकाचा दावा कुणी कधीच करू नये. ज्या निवडणुका चिन्हावर लढवल्या जातात, तिथे असे दावे केले जाऊ शकतात. ग्रामपंचायत निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात हे काय देवेंद्र फडणवीसांना आम्ही सांगायला नको. दावे तुम्ही खुशाल करा”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
“नैरोबी-केनियातही निवडणुका झाल्या”
“नैरोबी-केनियालाही ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्यात दोन दिवसांपूर्वी. तिथेही हे म्हणतील की आमचे लोक निवडून आले. उसमें क्या है… महाराष्ट्र, देश या ठिकाणी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते नक्कीच लढतात. आपापले पॅनल उभे करतात. कुणी जिंकून येतं. पण ते सोडून द्या”, असंही संजय राऊत म्हणाले.