आटपाडीत एका सरपंच इच्छुकाची शक्कल

भाडेकराराने काहीही अगदी मिळते, मात्र ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यासाठी आटपाडी तालुक्यात एका इच्छुकाने नियमात बसण्यासाठी चक्क शौचालय भाडेकराराने घेतल्याचे स्पष्ट झाले. आता त्याची उमेदवारी वैध की अवैध हे उद्या छाननी वेळी स्पष्ट होणार असले तरी गावच्या निवडणूक मदानात शासकीय नियमातून पळवाट काढण्यात गावकरी किती इरसाल असतात हे यावरून दिसून आले.

जिल्ह्यात ४४३६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून मुदतीत ‘ऑनलाइन’ उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांची गेला आठवडाभर दमछाक झाली. हा अर्ज भरताना त्यातील नियमांचे दाखले जोडतानाही इच्छुकांची धांदल उडत आहे. मुलांची संख्या दोनच हवी, याचबरोबर मालकीचे शौचालय हवे, तसे प्रतिज्ञापत्र जोडून चालत नाही तर मालकीच्या घरात शौचालय असल्याचा ग्रामसेवकाचा दाखलाही जोडावा लागतो. आटपाडी तालुक्यातील लिंगिवरे गावी एका इच्छुकाची यासाठी बरीच दमछाक झाली. एरवी पहाटेच्या प्रहरी गावाजवळच्या आडोशाला गेले की काम झाले. मात्र सपपंच व्हायचे असेल तर आता ते दाखवावे लागणार हे लक्षात आल्याने त्याची चांगलीच धांदल उडाली. आता ऐन वेळी शौचालय उभे करून तसा ग्रामसेवकांचा दाखला मिळविणे हे सोपे नाही. हे लक्षात येताच या उमेदवारांनी यावरही तोडगा काढला. गावात स्वतचे घर असताना शौचालयासह असणारे एक घर भाडेकराराने घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार तसे घरही मिळाले. घरमालकांशी भाडेकरार करून तसा करार उमेदवारीअर्जासोबत जोडला. त्यांच्या या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. पण आता तो वैध की अवैध ठरवायचा यावरून सरकार दरबारी आणि गावच्या चावडीवर कीस पडू लागला आहे. मंगळवारी अर्जाची छाननी होणार असून यानंतर या अर्जाचे भवितव्य अंतिम होईल.

Story img Loader