लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर: बार्शी तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासह इतर अवैध व्यवसायांच्या विरोधात तक्रारी देणा-या एका ग्रामपंचायत सदस्य तथा माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यावर वाळू माफियांच्या हस्तकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी गावाजवळ हा प्रकार घडला.

आकाश पांडुरंग दळवी असे खांडवी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना बार्शीच्या जगदाळे मामा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून ते बेशुध्दावस्थेतून बाहेर आले नाहीत. आकाश दळवी हे मध्यरात्रीनंतर गावानजीकच्या ओढ्याजवळून जात होते. ओढ्यात जेसीबी व ट्रॕक्टरच्या साह्याने अवैध वाळू उपसा होताना दिसून आला. तेव्हा दळवी यांनी तात्काळ स्मार्टफोनने वाळू उत्खननाचे चित्रिकरण केले आणि समाज माध्यमांवर प्रसारीत केले. हा प्रकार लक्षात येताच ओढ्यातील ट्रॕक्टर व जेसीबी चालकांनी वाहने तेथेच थांबवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दळवी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाळू माफियाच्या हस्तकांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात डोक्याला गंभीर जखम झाली. हातापायांनाही जबर मार बसला. दळवी हे रूग्णालयात बेशुध्दावस्थेत असल्यामुळे पोलिसांना फिर्यादी जबाब घेता आला नाही.

हेही वाचा… “नोटीस आल्यावर मोदींची भेट घेतली”, एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज…”

आकाश दळवी यांनी बार्शी तालुक्यात राजकीय संरक्षणाखाली राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उपशासह इतर अवैध व्यवसायांच्या विरोधात परिणामकारक कारवाई होण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिका-यांना भेटून निवेदन सादर केले होते. तक्रार करून चार दिवसही उलटत नाहीत, तोच दळवी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat member assaulted for stopping illegal sand smuggling in solapur dvr