तालुक्यातील मौजे गोवर्धन हद्दीतील गट नं. ७ अ मधील जागा ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कलाग्रामसाठी राखीव ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला असून नियोजित कलाग्राम अन्यत्र हलविण्यात यावे यासाठी ग्रामस्थ आंदोलन छेडणार आहेत, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. २००९ पासून गट नं. ७ अ मधील जागा क्रीडांगण, वाचनालय, व्यायामशाळा, गावठाण विस्तार यासाठी मिळावी म्हणून ग्रामस्थांकडून प्रयत्न होत आहेत. त्याबद्दल वेळोवेळी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त यांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु २५ एप्रिल २०१३ रोजी संबंधित खात्याचे अधिकारी नियोजित कलाग्रामसाठी जमिनीचे मोजमाप करण्याकरिता गोवर्धन हद्दीत आले होते. त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने शांतपणे विरोध केला. पण या विरोधाची कोणतीही दखल शासनाने घेतल्याचे दिसत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. ग्रामस्थांच्या विरोधाला भीक न घालता जमीन मोजमापनासाठी संबंधित अधिकारी पुन्हा ७ मे रोजी येणार आहेत. हा नियोजित कलाग्राम प्रकल्प गट नं. ७ अ या जागेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही जागेत घेण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही (उदा. मौजे गोवर्धन येथील गट नं. ४८ मधील जव्हार एज्युकेशन संस्थेलगत असलेली ९० आर जागा, गोवर्धन शिवारातील गट नं. ३२ मधील मुंबई एज्युकेशन सोसायटी या संस्थेस २००४ मध्ये चार हेक्टर जागा शैक्षणिक कामासाठी देण्यात आलेली आहे, परंतु नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही येथे कोणतेही शैक्षणिक कार्य सुरू झालेले दिसत नाही. त्याप्रमाणे ही जागा सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी हे नियोजित कलाग्राम उभारावे). गोवर्धन गावातील क्रीडांगण, वाचनालय, व्यायामशाळा, गावठाण विस्तार यांसारख्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करून शासनाने गट नं. ७ अ या जागेवर लक्ष केंद्रित केले आहे. शासनाच्या भौतिक सुखाच्या विकासामुळे गावातील संस्कृती व विकास खुंटण्याचे काम होत आहे. शासनाच्या या जनविरोधी निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच मंगळवारी गोवर्धन येथील गट नं. ७ अ च्या मोजणीस व नियोजित कलाग्राम अन्यत्र हलविण्याच्या मागणीकरिता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नियोजित कलाग्रामविरोधात गोवर्धनवासीयांचा लढा
तालुक्यातील मौजे गोवर्धन हद्दीतील गट नं. ७ अ मधील जागा ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कलाग्रामसाठी राखीव ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला असून नियोजित कलाग्राम अन्यत्र हलविण्यात यावे यासाठी ग्रामस्थ आंदोलन छेडणार आहेत, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
First published on: 06-05-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat unhappy over land giving to maharashtra tourism department