दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पैठण तालुक्यातील आलियाबादचा ग्रामसेवक बाबासाहेब नवनाथ तांबे (वय ४४) याच्याविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर यांच्या पथकाने बाबासाहेब तांबे यास ताब्यात घेतले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानित विहिरीचे चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भातील रक्कम प्राप्त करून देण्यासाठी १० हजारांची रक्कम तांबे याने तक्रारदाराकडे मागितली. या संदर्भातील तक्रार ११ एप्रिल २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. परंतु तांबे यास संशय आल्याने लाच स्वीकारली नाही. या प्रकरणी तांबे विरुध्द बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.