सुवर्ण त्रिकोणातील एक कोन ठरलेल्या नाशिक शहरात स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीचा वाढता ओढा लक्षात घेऊन गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने क्रेडाईच्यावतीने आयोजित ‘शेल्टर २०१२’ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी महापौर अॅड. यतीन वाघ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष किरण चव्हाण, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, पालिका आयुक्त संजय खंदारे उपस्थित होते. शहरवासीयांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केला.
येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या सोहळ्यास क्रेडाईचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापौर अॅड. वाघ यांनी उद्घाटन झाल्यानंतर प्रदर्शनाची पाहणी केली. याप्रसंगी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व इतर मान्यवरही उपस्थित होते. महापौरांनी प्रदर्शनातील अनेक स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. घर पसंत पडल्यास वित्तपुरवठा संस्थांचेही स्टॉल असून जागेवर कर्ज मंजूर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. प्रदर्शनाद्वारे घरकुलाची स्वप्नपूर्ती करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्रमुख मान्यवरांकडून सांगण्यात आले.
प्लॉट, फ्लॅट, बंगला, रो-हाऊस, जागा यासारख्या तीन हजारांपेक्षा अधिक मालमत्तेची माहिती येथे मिळू शकेल. गृह प्रकल्पाशी संबंधित साहित्य पुरवठादार, होम सिक्युरिटी, सॅनिटरी वेअर, गृहसजावट यांच्यासह २५० पेक्षा अधिक स्टॉल्स येथे आहेत. अधिकाधिक नाशिककरांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा