सावंतवाडी : मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा पुतळा ताशी २०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही सामना करू शकेल, याची महत्त्वपूर्ण तपासणी पूर्ण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हीनटेक या संस्थेने ही तपासणी करून पुतळ्याला प्रमाणपत्र दिले आहे, तर या पुतळ्याचे डिझाइन आयआयटी मुंबईने मंजूर केले आहे.

या पुतळ्याच्या उभारणीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीमार्फत हे काम केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी सांगितले की, पुतळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षी ४ नोव्हेंबर रोजी मालवणमध्ये नौदल दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले होते. मात्र, दुर्देवाने अवघ्या आठ महिन्यांत, २६ ऑगस्ट २०२४ रोजी हा पुतळा कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

यानंतर राज्य शासनाने तातडीने नवीन पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. नव्याने उभारण्यात येणाऱ्या या शिवपुतळ्याचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट्स क्रिएशन या कंपनीला सोपवण्यात आले आहे. या पुतळ्यासह  इतर कामांसाठी  ३१ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हा पुतळा तब्बल १०० वर्षे टिकेल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, पुढील १० वर्षांसाठी याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी राम सुतार आर्ट्स क्रिएशन कंपनीकडेच असणार आहे. ८३ फूट उंच असलेला हा तलवारधारी शिवपुतळा एका १० फूट उंच चबुतऱ्यावर उभा आहे. या पुतळ्यातील तलवारीचे वजन २३०० किलो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मालवणमध्ये वाऱ्याची सरासरी गती ताशी ४० ते ५० किलोमीटर असते. मात्र, या पुतळ्याची रचना करताना तो ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे वाहत असले तरी सुरक्षित राहील, असे प्रमाणपत्र ऑस्ट्रेलियातील व्हीनटेक कंपनीने दिले आहे.