पद्मसिंहांचा सेनेकडून दारूण पराभव
उस्मानाबाद – सर्वाचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावला. एकतर्फीच झालेल्या लढतीत गायकवाड यांनी तब्बल २ लाख ३३ हजार ७६५ मतांची दणदणीत आघाडी घेत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना पराभूत केले. उस्मानाबाद हा तसा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पूर्वी आरक्षित असलेला हा मतदारसंघ २००९मध्ये खुला झाल्यानंतर खासदार डॉ. पाटील यांनी प्रथमच निवडणूक लढवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी प्रा. गायकवाड अवघ्या ६ हजार ७८७ मतांनी पराभूत झाले होते. देशभरात असलेला ‘नमो’चा गजर व सेनेच्या सर्वानीच एकदिलाने केलेल्या कामाची पावती प्रा. गायकवाड यांना मिळाली. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून गायकवाड यांनी शेवटच्या, २७व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यांना ६ लाख ६ हजार ३५१, तर डॉ. पाटील यांना ३ लाख ७२ हजार ५८६ मते मिळाली. डॉ. पाटील यांनी आतापर्यंत सहा विधानसभा व एक लोकसभा निवडणूक लढवून मतदारसंघावर आपले निर्वविाद वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, कधीही पराभव न पाहिलेल्या दिग्गजाला पराभूत करून नवा इतिहास रचला गेला.
कौल मान्य – डॉ. पाटील
मागील ४० वर्षांच्या कारकीर्दीत उस्मानाबाद जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले. या प्रेमाच्या शक्तिमुळेच सर्वागीण विकासात मला योगदान देता आले. याचे समाधान जीवनभर राहील. यापुढेही सर्वाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे. जनताजनार्दनाचा कौल मान्य करीत विजयी उमेदवार प्रा. गायकवाड यांना शुभेच्छा देताना जिल्ह्याच्या विकासास आपले सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया मावळते खासदार डॉ. पाटील यांनी दिली.
मुंडेंनी भेदला राष्ट्रवादीचा चक्रव्यूह
बीड – बीड मतदारसंघात भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी नेत्रदीपक विजय मिळविला. राष्ट्रवादीचे शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी प्रतिष्ठा पणाला लावताना निर्माण केलेला ‘चक्रव्यूह’ भेदून मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांचा दीड लाखांच्या मताधिक्क्याने पराभव करुन विजय खेचून आणला. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या सहाही मतदारसंघांत मताधिक्य घेत मुंडे यांनी जादूची कांडी प्रभावी असल्याचे पुन्हा सिद्ध केले. मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळाले.
सतराव्या फेरीअखेर मुंडे यांनी ४ लाख ८१ हजार २८६, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी ३ लाख ७९ हजार ७९७ मते घेतली. या फेरीअखेर मुंडे यांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेत विजय निश्चित केला. आम आदमी पक्षाचे नंदू माधव यांना ३ हजार ३७१, तर बसपचे दिगांबर राठोड यांना ११ हजार ४८ मते मिळाली. १२ लाख ३७ हजार मतांची मोजणी २६ फेऱ्यांमध्ये सकाळी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच मुंडे यांनी आघाडी घेतली, ती कायम राहिली.
राष्ट्रवादीचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड विधानसभा क्षेत्रात मुंडेंची लाट थांबवण्यात यश मिळाले. येथे भाजपला सर्वात कमी ४ हजार ३४० मतांचे अधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांच्या आष्टी मतदारसंघातही मुंडेंना ६ हजारांचे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व अमरसिंह पंडित यांच्या गेवराई मतदारसंघातून भाजपला अनपेक्षितपणे ३० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्येही ३३ हजार, तर पृथ्वीराज साठे यांच्या मतदारसंघातही ३३ हजारांचे मताधिक्य मिळाले. परळीत भाजप आमदार पंकजा पालवे प्रतिनिधित्व करतात. मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात मुंडेंची लाट थांबविण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या मतदारसंघातही २७ हजारांचे मताधिक्य मुंडेंनी मिळवले.
मतमोजणीच्या २६ फेऱ्यांपकी १७ फेऱ्यांचे निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आले. उर्वरित ९ फेऱ्यांतील मतांची आकडेवारी जुळवण्याचे काम सुरू होते.
राष्ट्रवादीच संपली – मुंडे
पवार काका-पुतण्याने सत्ता, संपत्ती, दादागिरीचा वापर करून बीडमध्ये मला कोंडून ठेवण्यासाठी ताकद पणाला लावली. मात्र, मी राज्यभर प्रचार केला. बीडच्या जनतेने अभूतपूर्व विजय मिळवून दिला. राष्ट्रवादीला राज्यात केवळ चार जागा मिळाल्याने हा पक्ष संपला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल, असे वातावरण आहे. बीडच्या सहाही मतदारसंघांत आता महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा मुंडे यांनी केला.
सरकारच्या चुकांचा परिणाम – धस
काँग्रेस सरकारच्या चुकांमुळे देशात सर्वत्र जनमत विरोधात गेले. नरेंद्र मोदी यांची लाट व गोपीनाथ मुंडे उमेदवार यामुळे भाजपला विजय मिळाला. चुका सुधारून विधानसभेच्या तयारीला लागणार आहोत, असे धस यांनी सांगितले.
परभणीवर शिवसेनेचा भगवा
वार्ताहर, परभणी
परभणीत शिवसेनेचे संजय जाधव यांनी तब्बल १ लाख २७ हजार मताधिक्याने सेनेचा बालेकिल्ला राखला. जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५, तर राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना ४ लाख ५२ हजार ३०० मते मिळाली.
भांबळे यांना पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीने तब्बल अर्धा डझन नेत्यांना नोटिसा दिल्या, त्यावरुनच विरोधकांनी राष्ट्रवादीला आपल्या पराभवाचा अंदाज आल्याचे गणित लावले हाते. शिवसेनेचे आ. संजय जाधव आणि श्री. भांबळे यांच्यात निवडणुकीच्या टप्यात जी चुरशीची लढत वाटत होती ती आ. जाधव यांनी एकतर्फीच करुन दाखवली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ५५ हजारांचे मताधिक्य विजयात निर्णायक ठरले, तर भांबळेंच्या जिंतूर मतदारसंघातच त्यांना मोठा फटका बसला. जिंतूर मतदारसंघातही सेनेने साडेपाचशे मतांचे अधिक्य मिळवले. मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगीतही भांबळे यांना मताधिक्य मिळू शकले नाही. हमखास मताधिक्याची अपेक्षा बाळगलेल्या मतदारसंघांतच राष्ट्रवादीच्या पदरी साफ अपयश पडले. दुसरीकडे परभणी विधानसभा वगळता अन्य पाचही मतदारसंघांमध्ये सेनेला मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे जाधव यांचा दिल्लीचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेने १९८९पासून लढवलेल्या आजवरच्या निवडणुकांत जाधव यांना विक्रमी मतदान झाले. सेनेच्या आजवरच्या सर्व खासदारांचे विक्रम मोडीत काढत स्वतचा विक्रम प्रस्थापित केला. गेल्या निवडणुकीतील सेना उमेदवार गणेश दुधगावकरांपेक्षा दुप्पट मताधिक्य घेत जाधव यांनी विजय साजरा केला.
आता तरी बाहेरचा कोण ते ठरवा – जाधव
या निवडणुकीत विरोधकांनी आपल्यावर व्यक्तीगत पातळीवर टीका केली. जातीबद्दल आरोप केले, बाहेरचा म्हणून हिणवले. हे आरोप जनतेने खोटे ठरवले. आता तरी बाहेरचा कोण ते ठरवा, अशी प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी विजयानंतर दिली. सेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारा हा जिल्हा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी या जिल्ह्यात रुजवलेले सेनेचे बीज राष्ट्रवादीला कदापि काढून टाकता येणार नाही. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप विसरुन जनतेच्या प्रश्नांवर झगडत राहू, असेही ते म्हणाले.
महायुतीचा महाविजय
पद्मसिंहांचा सेनेकडून दारूण पराभवउस्मानाबाद - सर्वाचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावला. एकतर्फीच झालेल्या लढतीत गायकवाड यांनी तब्बल २ लाख ३३ हजार ७६५ मतांची दणदणीत आघाडी घेत राष्ट्रवादीचे खासदार …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2014 at 05:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand success of mahayuti