जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी परळीमध्ये फुलांचा वर्षाव करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. परळीकरांनी केलेल्या या स्वागतानंतर “माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती,” अशी भावूक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा सुरू आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली. यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचं हे तिसरं पर्व आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. एवढ्या पावसातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांचं जंगी स्वागत केलं. कार्यकर्त्यांच्या स्वागताने भारावून गेलेल्या पाटलांनी माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, असं म्हणत कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान, या परळीत गेलेल्या पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत पाहणी केली. परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यात भेटी देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच मांजरा प्रकल्पाचे जवळपास पूर्ण दरवाजे उघडल्याने नदीला पूर आला आहे व त्यामुळे पुढील अनेक गावे प्रभावित झाली आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
दरम्यान, पाटलांच्या जंगी स्वागतानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. पाटील आधी चंद्रावर होते. मात्र टीका झाल्यानंतर ते पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले, अशी खरमरीत टीका पडळकरांनी केली आहे.