दारूच्या नशेत बायकोला मारहाण करणाऱ्यास प्रतिबंध केल्याचा राग येऊन, नातवाने आजोबांना केलेल्या जबर मारहाणीत आजोबा जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. तालुक्यातील वनकुटे येथे शनिवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. पारनेर पोलिसांनी आरोपी नातवास अटक केली असून त्याच्या विरुद्घ गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी रात्री आरोपी मंजू रामा पारधी (वय २८, रा. भले दरा, वनकुटे, पारनेर) हा मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. तेथे त्याची पत्नी मंदा हिच्याशी वाद घालून मंजू याने तिला बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. ते पाहून मंजूचे वडील रामा भीमा यांनी मारहाण थांबवून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेफाम झालेल्या मंजूने वडिलांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केली.
आरडाओरडा ऐकून मंजूचे आजोबा भीमा सखाराम पारधी (वय ७५) हे घराबाहेर आले. त्यांनी मंजू यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत मारहाण रोखण्याचा प्रयत्न केला असता, आजोबांनाही मंजू याने छातीत, पाठीत तसेच हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत भीमा पारधी हे जागीच ठार झाले.
या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक शरद जांभळे, सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत भीमा पारधी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवून घटनास्थळीच असलेला आरोपी मंजू पारधी यास त्यांनी ताब्यात घेतले. उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. अनिता जामदार यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. निरीक्षक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली आबा ढोले, महेश भवर, शेलार आदी तपास करीत आहेत.

Story img Loader