सर्वच स्तरांवर विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात येथील नेल्सन मंडेला आश्रमशाळा अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून तिची मान्यता रद्द केली आहे. अचानकपणे घडलेल्या घटनेनंतर शाळा बंद झाल्याने पालकवर्गात घबराट पसरली आहे.
नागसेन एज्युकेशन सोसायटी अॅण्ड बुद्धीस्ट कल्चरल ट्रस्ट मुंबई संचलीत डॉ. नेल्सन मंडेला आश्रमशाळा येथे बावीस वर्षे कार्यरत होती. २०१३-१४ शैक्षणिक वर्षांत या शाळेत २१२ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत होते. एवढी वर्षे उलटूनही ही शाळा भाडय़ाच्या जागेत भरत होती. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्यात संस्थाचालक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत तिची मान्यता रद्द करण्याचा आदेश झाला असल्याचा समाजकल्याण खाते, अलिबागचे सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी सांगितले. आश्रमशाळा चालू झाल्यानंतर ३ ते ५ वर्षांत शाळेची स्वत:ची इमारत असणे अपरिहार्य असावी असा शासनाचा र्निबध आहे. मात्र बावीस वर्षे उलटूनही संस्थेला स्वत:ची इमारत बांधणे शक्य झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात शाळेच्या आवाराला कठडा नसल्याने एका विद्यार्थ्यांचा पडून तसेच सर्पदंशाने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. कर्मचारी भरतीमध्ये त्रुटी तसेच इतर सोयीसुविधांमध्ये संस्था असमर्थ ठरल्यामुळेच विमुक्त भटक्या जमाती कार्यालय, पुणेचे संचालकांनी या आश्रमशाळेवर कारवाईचा बडगा उचलला, असे जाधव यांनी सांगितले. याबाबत अनेक वर्षे या शाळेला नोटीस दिल्या जात होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून देण्यात आले होते, मात्र त्याची त्यांनी पूर्तता केली नाही, असे जाधव म्हणाले.
रायगडमध्ये समाजकल्याण विभागाची सात व जि.प.ची १३ अशी एकूण २० वसतिगृहे आहेत. ही शाळा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना संबंधित वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रा. ति. प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीसुद्धा यात लक्ष घातले असून त्यांना वसतिगृह तसेच शाळेत प्रवेश देण्याचा त्यांनी आदेश दिला असल्याचे प्रमोद जाधव यांनी सांगितले. या आश्रमशाळेत १३ शिक्षक व कर्मचारी असून टप्प्याटप्प्याने त्यांची इतर शाळांमध्ये भरती केली जाईल, असे ते म्हणाले. काही वसतिगृहांचे अधीक्षक येथे आले असून संबंधित वसतिगृहांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शाळा चालू होऊन १५ दिवस उलटतानाच ही शाळा बंद झाल्याने पालकवर्गामध्ये घबराट पसरली असून पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या मुलांना वसतिगृहात प्रवेश नसल्याने त्यांनी शिकायचे कसे, अशा विवंचनेत ते पडले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा