अहिल्यानगरः यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील द्राक्षांची युरोपसह थायलंड, बांगलादेश, मलेशिया आदी देशात निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्ष निर्यातीत यंदा दीडपट वाढीची शक्यता आहे. गेल्यावर्षी सन २०२३-२४ मध्ये १४८.२६ हेक्टरमधील २०६ प्लॉट द्राक्ष फळांची निर्यात झाली. जिल्हा कृषी विभागाच्या विशेष मोहिमेतून ३१ जानेवारीपर्यत ३२ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष फळांची निर्यात झाली आहे. सद्या द्राक्ष काढणीचा हंगाम चालू आहे, त्यामुळे ३१ मार्चपर्यंत सुमारे १.५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीची अपेक्षा जिल्हा कृषी विभागाकडून व्यक्त केली जाते.

जिल्ह्यात द्राक्षखालील क्षेत्र ३९४८ हेक्टर आहे. त्यातही श्रीगोंद्यातील पारगाव गटाने आघाडी घेतली आहे. यापूर्वी राहता, कोपरगाव, संगमनेर मधील क्षेत्र अधिक होते. जिल्ह्यात सन २००४-०५ पासून ‘अपेडा’च्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रेपनेट’ या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यातून जिल्ह्यातील द्राक्षची निर्यात वाढवून त्याचा फायदा द्राक्ष बागातदारांना होत आहे. ‘ग्रेपनेट’ या पोर्टलद्वारे निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या विविध देशांच्या नियमांची माहिती करून दिली जाते.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहेत. 

निर्यातक्षम द्राक्षसाठी कीडनाशकाचा उर्वरित अंश मुक्त हमीची अट प्रामुख्याने अंमलात आणली जाते. याशिवाय आकार, साखरेचे प्रमाण, द्राक्षवरील चमक, कीडरोग विरहित याला प्राधान्य दिले जाते. कृषी विभागाने गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम बागांची तपासणी करण्याकरिता कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकाऱ्यांना तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त केले. त्यातून निर्यातक्षम द्राक्ष बागांची वाढ झाली.

गेल्या वर्षी सन २०२३-२४ मध्ये दीड हजार हेक्टर क्षेत्रात ११०० प्लॉटचा निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी जिल्ह्यास लक्षांक देण्यात आला होता. मात्र ७२७ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली व त्यातील प्लॉटची संख्या होती १०७०. त्यातून १४५४० मे. टन निर्यातक्षम माल उत्पादित झाला. पैकी १४८.२६ हेक्टरमधील २०६ प्लॉटमधून द्राक्ष फळांची निर्यात झाली. आता यंदा, सन २०२४-२५ या वर्षात ४१०७ हेक्टरमध्ये १८०० प्लॉटचा लक्षांक देण्यात आला. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ६०८.७२ हेक्टरमध्ये ९१३ प्लॉटची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ३२ हेक्टरमधील द्राक्ष फळांची निर्यात झाली. ३१ मार्चपर्यंत ही संख्या दीड हजार हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी वर्तवला.

अधिक भाव

निर्यात करणाऱ्या द्राक्ष बागातदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थानिक बाजारापेक्षा अधिक भाव मिळतो आहे. थॉमसन, सोनाकासाठी ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो, शरद सिडलेस, काळ्या द्राक्षसाठी ७० ते ८० रु., क्रीम्प्सन ग्लोबसाठी ११५ ते १२५ रु., आरासाठी १६० रु. प्रतिकिलो भाव व्यापाऱ्यांकडून दिला जातो आहे. काही व्यापारी प्रयोगशाळेचा खर्च करतात तर काही ठिकाणी तो शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो, त्यानुसार दर ठरला जातो. व्यापाऱ्यांकडून माल घेऊन गेल्यानंतरही ७ टक्क्यांपर्यंत ‘रिजेक्शन’ केले जाते.

कृषी विभागाचा पुढाकार

कृषी विभागाने पुढाकार घेत जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ‘ग्रेपनेट’ प्रणाली व नोंदणी करण्यासाठी मोहिमेचे आयोजन केले. त्यातून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना पाळावयाच्या निकषांबाबत जाणीवजागृती निर्माण झाली. आता जिल्ह्यातील द्राक्ष बागातदारांचा निर्यातीकडे कल वाढू लागला आहे. –सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

गेल्या वर्षी दुबईला द्राक्ष पाठवली, यंदा बांगलादेशला जात आहेत. फळाची गुणवत्ता चांगली राखली तर व्यापारी धावत येतात. घड व काडी मर्यादित ठेवली पाहिजे, औषध फवारणी, कीडनियंत्रण याचे व्यवस्थापन झाले पाहिजे. त्यातून निर्यातक्षम उत्पादन तयार होते. –कुलदीप खेतमाळीस, द्राक्ष उत्पादक, पारगाव, श्रीगोंदा.

चार एकर क्रिम्प्सनची बाग तयार केली. निर्यातीचे तिसरे वर्ष आहे. उत्पादन घेण्यासाठी कन्सल्टंट नियुक्त करण्यात आला. सेंद्रिय खताद्वारेच उत्पादन घेतले जाते. सध्या व्यापाऱ्यांबरोबर चर्चा सुरु आहे. १२० रुपये किलो दर अपेक्षित आहे. –शिवाजी शिंदे, द्राक्ष उत्पादक, वावरथ जांभळी, राहुरी.

Story img Loader