सांगली : वैद्यकीय ज्ञानमंदिरे व उपचार केंद्रे ही देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाणारी आहेत. करोनाच्या संकट काळात आपल्या सांगली जिल्ह्यात ही परिस्थिती अत्यंत बिकट होती, मात्र प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने या संकट काळात मोठे योगदान दिले असल्याचे मत आ. सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले. इस्लामपूर येथील प्रकाश मेडीकल इन्स्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटरच्या २०१९ च्या बॅचमधील विद्यार्थी विद्यार्थिनींचा पदवीदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक निशिकांत भोसले-पाटील होते. यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, संचालिका सुनिता भोसले -पाटील, वैद्यकीय संचालक डॉ.विजय पाटील, रुग्णालय अधीक्षक डॉ. भूपाल गिरिगोसावी, अधिष्ठाता डॉ ज्योत्स्ना वडेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ.सत्यजित देशमुख म्हणाले, प्रकाश शिक्षण संस्थेचा जिल्ह्याच्या विकासात मोलाचा वाटा आहे, या संस्थेने फक्त डॉक्टर घडविले नाहीत तर देशाच्या विकासाला चालना देणारी पिढी घडविली आहे. वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यात डॉ.बाबा आमटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवेच्या माध्यमातून काम करावे असा सल्ला दिला. यावेळी श्री. भोसले-पाटील म्हणाले, या संस्थेत विद्यार्थी, अध्यापक व व्यवस्थापन समिती एक कुटुंब म्हणून पुढे जात आहे, करोना काळात देशावरील संकट हे माझ्या कुटुंबावरील संकट म्हणून आम्ही काम केले. यामध्ये विद्यार्थ्यांचाही मोलाचा वाटा आहे. यावेळी मधुरा झिरपे व प्रतीक चौरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली
सूत्रसंचालन जान्हवी सारडा, करण गुप्ता यांनी केले, स्वागत व प्रास्ताविक तिस्तावर यांनी केले, आभार नुसरत शेख यांनी मानले, २०१९ च्या बॅचमधील अनुक्रमे प्रथम रिद्धी पाटील, व्दितीय ईशा पावसकर व तृत्तीय आलेल्या श्रेया कदम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.