पुणे पोर्श अपघातप्रकरणानंतर पुण्यातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. तसंच, गेल्या काही दिवासंपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तर काही दिवसांपूर्वी एफसी रोड परिसरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये मध्यरात्री काही अल्पवयीन मुलांनी ड्रग्स सेवन करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सर्व घटनांवरून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका केली जातेय. तसंच, मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत”, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावरून आता अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यामुळे आता महायुतीत बिघाडी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत”, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. मात्र, त्यानंतर पुन्हा या विधानावरून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते पुढं म्हणाले, “अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी १४ लाख होती. आता ७० लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण , रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

अमोल मिटकरींचा टोला काय?

“चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत”, अशी एक्स पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार गट आणि भाजपाचे चंद्रकांत पाटील महायुतीचे सदस्य असूनही या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय. त्यामुळे महायुतीत बिघाड झाल्याची चर्चा आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थाचा विषय चांगलाच गाजत आहे. आज काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली. यावर प्रत्युत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, “अशा प्रकारच्या सर्व घटनांना थेट मंत्र्यांना जबाबदार धरणं योग्य नाही. जर मंत्र्यांची इनव्हॉलमेंट असल्याचं सिद्ध झालं तर अशा पद्धतीने बोलायला हरकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great failure in the grand alliance ajit pawar group criticizes chandrakant patil on the worrying incident in pune sgk