सांगली : जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही म्हणून सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हरित न्यायालयाने ४ कोटी ६२ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला असल्याची माहिती याचिकाकर्ते रवींद्र वळवडे यांनी शनिवारी दिली. तसेच मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी करण्यास २४ महिन्यांची मुदत दिली आहे.
वळिवडे यांनी सांगितले, की शासकीय रुग्णालयात जैववैद्यकीय कचरा आणि सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे गरजेचे असताना दोन्ही रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णालय व अन्य परिसरात पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत ॲड. ओंकार वांगीकर यांच्यामार्फत हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर हरित न्यायालयाने सांगलीतील शासकीय जिल्हा रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली असून, हा दंड प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दोन महिन्यांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. मंडळाने या दंडाच्या रकमेतून दूषित पाणी शुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी उभा करावा, असेही निर्देश दिले आहेत.
मिरज रुग्णालयाने शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला असल्याचे सुनावणी वेळी सांगितले. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू केले असल्याचे सांगून प्रकल्प पूर्ततेसाठी २४ महिन्यांची मुदत मागून घेतली. हरित न्यायालयाने ही मुदत मंजूर केली असल्याचे वळिवडे यांनी सांगितले.