बडे थकबाकीदार, भ्रष्ट पदाधिकाऱ्यांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या बाबत लवकरच बठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
औरंगाबाद येथे नुकत्याच दुष्काळी आढावा बठकीत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याबाबत मागणीचे निवेदन दिले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कणा म्हणून ओळख असलेली जिल्हा बँक चलन तुटवडय़ामुळे अडचणीत आहे. परिणामी शेतकरी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना आर्थिक मदत केली, त्याच धर्तीवर जिल्हा बँकेला मदत द्यावी, या मागणीवर बठक घेऊन प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. २५ नोव्हेंबरच्या परिपत्रकात जिल्ह्यातील रब्बीची नोंद असणाऱ्या ३५६ गावांना आपत्तीत सवलती मिळणार नाहीत. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. सरकारने तातडीने नियमात बदल करून या गावांना न्याय द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
पीकविम्याची रक्कम मिळण्यास होणारा उशीर टाळून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्यावा. तसेच रोहित्र बिघडल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचे ७० टक्के वीजबिल भरल्यास रोहित्र तातडीने दुरुस्त करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या. या सूचनेला आमदार पाटील यांनी विरोध करीत शेतकरी आíथक अडचणींमुळे बिल भरू शकत नाहीत, त्यांची पिके वाचण्यासाठी वेळेत रोहित्र दुरुस्त करण्याबाबत विनंती केली असता, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader