शहरातील व शहरालगतच्या वनजमिनींवर जंगल निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतला आहे. ‘अर्बन ग्रीन’ संकल्पनेवर आधारीत या उपक्रमाची सुरूवात नगर शहरातून करू, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी जावडेकर शनिवारी नगरला आले होते. या कार्यक्रमाआधी ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीस आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भानुदास बेरड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जावडेकर यांनी केंद्रातील पूर्वीचे युपीए सरकार आणि राज्यातील दोन्ही काँग्रसच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले, या दोन्ही सरकारांनी राज्यात व देशात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण केला आहे. तो भरून काढण्यासाठी राज्यात आणि देशातही भाजपचे सरकार वेगाने कार्यरत झाले आहे. पुर्वीच्या सरकारमध्ये पर्यावरण विभाग हाच विकासातील मोठा अडसर होता. तो दूर करण्याच्या दृष्टीने भाजपच्या केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. प्राधान्याने देशाच्या सर्वच सीमांपासून १०० किलोमीटर अंतरात संरक्षण विभागाला त्यांच्या गरजेनुसार आता बांधकाम करणे सोपे झाले आहे. तसेच राज्यांच्या अख्यत्यारीतील जंगले, वनजमिनी यातून सिंचनाचे कालवे, रेल्वेमार्ग, वीजवाहीन्या जात असतील, त्यासाठी तातडीने ऑनलाईन परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबतचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. यातील परवाना राज मोडीत काढण्यात आल्याचा दावा जावडेकर यांनी केला. श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यातील नियोजित माळढोक अभायरण्याच्या विषयावर येत्या महिनाभरात बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
दिल्लीतील पक्षाच्या पराभवाची कारणे स्थानिक आहेत. त्याचा पंतप्राधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी काहीही संबंध नाही. ही कारणेही वेगळी आहेत. दिल्लीतील निकाल काहीही लागला असला तरी, हे अपयश धुऊन निघेल. नगरपालिकांच्या माध्यमातून आसाममध्ये भाजपने घोडदौड सुरू केली आहे. नजिकच्याच काळात २० राज्यामंध्ये भाजपचे मुख्यमंत्री दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेलाही देशात सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. देशात पक्षाचे १० कोटी सभासद नोंदवले गेले असून त्याच्याच आधारे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनल्याचा दावा जावडेकर यांनी केला. नगर जिल्ह्य़ातही ७ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जावडेकर निरूत्तर!
आढावा बैठकीत जावडेकर यांनी सुरूवातीलाच ‘तक्रारी करू नका, सदस्य नोंदणीतील अनुभव फक्त सांगा’ असे पदाधिकाऱ्यांना खडसावले. त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या अनुभवाने जावडेकर यांच्यावरच डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. कांदा निर्यात, दूध भुकटीची निर्यात, ऊसाच्या भावाचा प्रश्न या पाश्र्वभुमीवलर ग्रामीण भागात पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला मर्यादा पडत आहेत. ‘हे अच्छे दिन नाहीत’ असे लोकच सांगू लागले आगेत, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यावरही जावडेकर यांनी तक्रारी करू नका, अनुभव सांगा, असेच पालुपद लावले. त्याला उत्तर देताना या पदाधिकाऱ्याने ‘ही तक्रार नाही, अनुभव सांगतोय’, असे म्हटल्यावर जावडेकर हेच निरूत्तर झाले!
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2015 रोजी प्रकाशित
नगरमधून ‘अर्बन ग्रीन’ संकल्पनेची सुरूवात
शहरातील व शहरालगतच्या वनजमिनींवर जंगल निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतला आहे. ‘अर्बन ग्रीन’ संकल्पनेवर आधारीत या उपक्रमाची सुरूवात नगर शहरातून करू, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-02-2015 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green urban start in nagar