राष्ट्रवादी काँग्रेसने दुस-यांदा सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेले माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आज दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या १०१व्या जयंतिदिनाचे औचित्य साधून सातारा ते कराड अशी प्रचार शुभारंभ महारॅली काढली. रथयात्रेने येत उदयनराजे भोसले व समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. यानंतर कृष्णा घाट येथे साध्या पद्धतीने आयोजिलेल्या सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी एकत्रित प्रचाराची हमी देत उदयनराजेंना उच्चांकी मताधिक्याने विजयी करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान, नियोजित सभास्थळाचा निम्मा मंडप पालिकेच्या मिळकत हद्दीत, तर निम्मा मंडप कृष्णाबाई उत्सव कमिटीच्या हद्दीत येत असल्याने ऐनवेळी छत्रीचा आधार घेत तळपत्या उन्हात सभा पार पडली. साता-याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सारंग पाटील, सभेचे निमंत्रक सुनील काटकर, कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर यांच्यासह काँग्रेस आघाडीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, की आज ऐतिहासिक महारॅलीने महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी लोकसभेचे उमेदवार उदयनराजे व काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले आहे. जिल्हय़ातील कामकाजाचा विचार आणि विकास हा चव्हाणसाहेबांच्याच दृष्टिकोनातील असून, त्यांचे विचार कायम जागृत व कृतिशील ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी आज आपण उदयनराजेंना देशात विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करू या, सर्वानी एकत्रितरीत्या कार्यरत राहू या असे आवाहन त्यांनी केले.
उदयनराजे म्हणाले, की सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून प्रचारास सुरुवात होत असल्याचे समाधान आहे. सातारच्या या सुपुत्राने केवळ महाराष्ट्रालाच नव्हेतर अवघ्या देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची मिळालेली संधी मी भाग्याची मानतो. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी अन् विचारातूनच देशाची प्रगती होईल असा विश्वास त्यांनी दिला. आपण जनतेच्या सेवेशी २४ तास ३६५ दिवस सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आपल्या पाच वर्षांतील कामकाजाचा आढावा घेणारी पुस्तिका लवकरच प्रकाशित करीत असून, त्यातून आपल्या कार्यावर प्रकाश पडेल असे त्यांनी स्पष्ट केले.
आनंदराव पाटील यांनी सर्वसामान्य मतदारांपर्यंत आघाडी शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय व लोकाभिमुख कारभार पोहोचवावा, मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करू या असे आवाहन केले.
यशवंतरावांना अभिवादन करत उदयनराजेंचा प्रचारास प्रारंभ
राष्ट्रवादी काँग्रेसने दुस-यांदा सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेले माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आज दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या १०१व्या जयंतिदिनाचे औचित्य साधून सातारा ते कराड अशी प्रचार शुभारंभ महारॅली काढली.

First published on: 13-03-2014 at 03:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greeting to yashwantrao by udayanraje and start promotion