लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : रायगडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला अखेर नवीन सात मजली इमारत मिळणार आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या नुतन इमारतीचे भुमिपूजन होणार आहे. आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारंभाला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी दिली. दिडशे कोटी रुपये खर्चून ही नवीन इमारत बांधली जाणार आहे. बुधवारी ५ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हा भूमीपूजन समारंभ होणार आहे.

जिल्हा रुग्णालयाची आंतररुग्ण विभागाची इमारत जीर्ण झाली होती. दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही ही या इमारती पडझड सुरूच होती. हीबाब लक्षात घेऊन नवी इमारत उभारण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. नवीन इमारतीचे बांधकाम खर्चीक बाब असल्याने त्याबाबत ठोस निर्णय होत नव्हता. त्यामुळ इमारतीच्या डागडुजीवर गेल्या पाच ते दहा वर्षात १६ कोटींहून अधिकचा निधी खर्ची पडला होता.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसरकारच्या उच्चाधिकार समितीने एकूण साडे चारशे कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. २ लाख चौरस फुटाची सात मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार असून. ३०० खाटांच्या या नवीन इमारती साठी पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे. पुण्यातील कंपनीला या कामाची निविदा देण्यात आली आहे.

केंद्राच्या नियमानुसार पब्लिक हेल्थ सेंटरच्या मान्यतेनुसार खाजगी पद्धतीचे अद्यावत असे बांधकाम केले जाणार आहे. ज्यात २० खाटांचा अतिदक्षता विभाग, १६ खाटांचे नवजात बालक उपचार कक्ष आणि २० खाटांचे डायलेसिस युनीटचा समावेश असणार आहे. अपघात विभागसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्षाही उभारला जाणार आहे.

इमारतीत पाच अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्ष ही बांधले जाणार आहेत. एचआयव्ही, एचएसबी बधितासाठीही वेगळे शस्त्रक्रिया कक्ष असणार आहे. याशिवाय लॉड्री, पाककक्ष, क्ष किरण कक्ष, चार लिफ्ट, दोन जिने एक रॅम्प अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे. त्यामुळे नागरिकांना अद्यावत असे जिल्हा रुग्णालय मिळणार असून उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे.

जिल्हा रुग्णालयातील आंतर रुग्ण विभागाची इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधणे आवश्यक होते. आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत या कामाला बुधवारी सुरूवात होणार आहे. निविदा प्रक्रीया झाली आहे. रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असेल. -महेंद्र दळवी, आमदार