अहिल्यानगर : जिल्ह्यात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला असला तरी यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेतील सरासरीपेक्षा १.८७ मीटरने अधिक घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील पाणी टंचाई अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मे महिन्यात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. सध्याच जिल्ह्यात ६० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबरमध्ये टंचाई निवारण आराखडा तयार करताना भूजल सर्वेक्षण विभागाने टंचाई कमी भासेल, असे भाकीत वर्तवले होते.

जिल्ह्यात सरासरी ४४८.६ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, गेल्यावर्षी ६२५.७ मिमी पावसाची झाला. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात, २०२ निरीक्षण विहिरींच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी घटल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर २०२४ मधील सर्वेंक्षणात भूजल पातळीत वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्यात त्यात मोठी घट झाली.

जिल्ह्यात अग्नीजन्य खडक असल्याने पावसाचे पाणी झिरपत नाही. तसेच या खडकला भेगा नाहीत. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेला खडक जिल्हा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मोठा पाऊस होऊनही पाणी साठवले जात नाही. त्याचा परिणाम भूजल पातळी कमी होण्यावर होत असल्याचे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गावडे यांनी व्यक्त केले.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्ह्यातील १४ तालुक्यातील २०२ निरीक्षण विहिरी आहेत. या विहिरीच्या माध्यमातून भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. ही भूजल पातळीची मागील पाच वर्षाच्या मार्च महिन्यामधील सरासरी तुलनात्मक स्थिती विचारात घेऊन यंदाच्या मार्च २०२५ ची भूजल पातळी निश्चित करण्यात येते. त्याआधारे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे.

मार्च महिन्यात पातळी खालावल्याने एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तलाव, विहिरींच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई आता अधिक भासू लागली आहे. येत्या काही दिवसात आणख वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू शकते.

सप्टेंबर २०२४ मधील सर्वेक्षणानुसार भूजल पातळीमध्ये वाढ झाली होती. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (आकडे मीटरमध्ये): अहिल्यानगर- ०.८९, पारनेर- १.२२, पाथर्डी- ०.५३, शेवगाव- ०.९८, श्रीरामपूर- ०.४८, राहुरी- ०.७८ नेवासा- ०.४३, कर्जत- ०.९१, जामखेड-१.४०, श्रीगोंदा- ०.७७, संगमनेर- ०.४८, अकोले- ०.२४, कोपरगाव- १.३१, राहाता- ०.२१.

पाच तालुक्यांतील घट अधिक

सप्टेंबर २०२४ नंतर सहाच महिन्याने मार्च २०२५ मधील सर्वेक्षणात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. (आकडे मीटरमध्ये) अहिल्यानगर- २.४९, पारनेर- १.९१, पाथर्डी- १.१७, शेवगाव-२.२४, श्रीरामपूर- १.९१, राहुरी- १.४५, नेवासा- २.१४, कर्जत- २.०३, जामखेड- २.२०, श्रीगोंदा- १.६१, संगमनेर- २.३०, अकोले- १.१४, कोपरगाव- १.९५ व राहाता-१.७८. अहिल्यानगर, संगमनेर, शेवगाव, जामखेड व कर्जत या पाच तालुक्यांत भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. मात्र, मार्चमधील सर्वेक्षणात कोपरगाव तालुक्यात ९.६२ मीटरने पातळी घटली. सरासरी १.९५ मीटरची घट आहे.