महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनाक्रमात संतप्त माकडांच्या टोळीने तब्बल २५० कुत्र्यांची हत्या केलीय. या घटनेने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ही घटना घडली. मागील महिन्यापासून ही संतप्त माकडांची ही टोळी बेभान होऊन कुत्र्यांना ठार मारण्याचं काम करत आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिलं आहे.
कुत्र्यांना मारण्याची माकडांची खास पद्धत
संतप्त माकडांची ही टोळी खास पद्धतीने कुत्र्यांची हत्या करत आहे. ही सर्व माकडं कुत्र्याला एखाद्या इमारतीच्या किंवा झाडाच्या वरच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून या पकडलेल्या कुत्र्याला खाली टाकून देतात.
माकडांच्या या हाहाकारानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागालाही दिली. तसेच या परिसरात उच्छाद घालणाऱ्या माकडांना पकडण्याची मागणी केली. एक दिवस वनविभागाचे कर्मचारी आलेही, मात्र त्यांना या माकडांच्या टोळीतील एकाही माकडाला पकडता आलं नाही. ते रिकाम्या हातीच मागे गेले.
हेही वाचा : …अन् कासव पडले पाण्यात; पाणगेंड्याच्या पाठीवर बसलेल्या कासवांचा व्हिडीओ व्हायरल
माकडांकडून कुत्र्यांच्या हत्येचं कारण काय?
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारलं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरुवात केली. ही माकडांची टोळी परिसरातील कुत्र्यांवर लक्ष ठेऊन त्यांना पकडून नेते आणि ठार मारते. हा प्रकार मागील महिनाभरापासून सुरू आहे. माकडांच्या हाहाकाराने या परिसरात कुत्रं दिसणं महाग झालं आहे. या काळात माकडांनी तब्बल २५० कुत्र्यांचा जीव घेतला.