सोलापूर : १० कोटी ८३ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाने सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंवर अटकेची कारवाई केली. न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. एआरएल ऑईल इंडिया प्रा. लि. कंपनीशी संबंधित झालेल्या कारवाईत लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा (वय ३७) आणि श्रीकांत सुरेंद्र लड्डा (वय ३५, दोघे रा. नाकोडा युनिटी, जुना पुणे नाका, सोलापूर) या बंधूंना अटक करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने सोलापुरात अशी पहिलीच कारवाई केल्याचे बोलले जाते.
या संदर्भात जीएसटी विभागाचे उपायुक्त रवींद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मीकांत लड्डा व श्रीकांत लड्डा हे दोघे बंधू एका छोट्या खोलीत बनावट कंपन्यांच्या नावाने आर्थिक व्यवहार करायचे. यातून त्यांनी २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत ६९ कोटी ३५ लाख रुपयांची उलाढाल केली. यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, नवसाना, मध्य प्रदेशातील इंदूर, तसेच दमण आणि दीव आदी ठिकाणी व्यवहार झाले. या व्यवहारामध्ये त्यांनी नोंदवहीत आवक-जावक नोंदी ठेवल्या नाहीत.
दरम्यान, हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वस्तू व सेवा कर विभागाने लड्डा बंधूंना स्पष्टीकरण मागितले. वारंवार बोलावूनही सुनावणीच्या वेळी ते गैरहजर राहिले. त्यामुळे शेवटी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. लड्डा बंधूंना अटक करून न्यायदंडाधिकारी रागिणी जंगम यांच्यासमोर हजर केले असता, सरकारी वकिलांनी त्यांना अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली. परंतु, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. नंतर अंतरिम जामीन अर्ज केला असता तो फेटाळला गेला.