कुंभमेळ्यासाठी दाखल झालेल्या साधू-महंतांशी आदल्या दिवशी जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधल्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही साधू-महंतांचे म्हणणे ऐकून घेत आखाडय़ांच्या ध्वजारोहणापूर्वी अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. कुंभमेळ्याचा आराखडा तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. राज्यात सत्ताधारी झाल्याने अखेरच्या टप्प्यात सिंहस्थाची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी भाजप-सेना युतीवर आली. या विकास कामांचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये म्हणून विद्यमान पालकमंत्रीच नव्हे तर, भाजपचे विद्यमान आमदारही अचानक सक्रिय झाल्याचे पाहवयास मिळाले. महाजन यांच्यासमोर साधू-महंतांनी विविध अडचणींचा पाढा वाचला.
रविवारी माजी मंत्री भुजबळ यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे विविध आखाडय़ांना भेट देत महंतांची विचारपूस केली. मागील काही दिवसांपासून साधू-महंत सत्ताधारी भाजप व पालकमंत्र्यांच्या विरोधात ओरड करीत आहेत. ही वेळ साधत भुजबळ यांनी नाशिककर म्हणून सर्वाच्या स्वागताची भूमिका स्वीकारल्याचे नमूद केले. प्रमुख महंतांशी त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करीत व्यथा जाणून घेतल्या. या घडामोडीनंतर सोमवारी विद्यमान पालकमंत्री महाजन हे अचानक सिंहस्थ नगरीत दाखल झाले. त्यांच्या शासकीय दौऱ्याची प्रशासनालाही कल्पना नव्हती. साधुग्राममध्ये आखाडे व खालशांना जागा कमी पडत असल्याने वाद निर्माण झाले होते. भेटीत कमी पडणाऱ्या जागेसंदर्भात तक्रारी मांडण्यात आल्या. साधुग्राममध्ये अद्याप ४० ते ५० खालशांना जागा मिळालेली नाही. ऐनवेळी ती प्रशासन उपलब्ध करून देईल याची आशाही नाही. यामुळे काही खालशांनी खासगी जागेत  डेरा टाकण्याचे ठरविले आहे. या जागेवर प्रशासनाने वीज, पाणी व प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, याकडे लक्ष वेधण्यात आले.
प्रशासन आखाडे व खालशांना अन्नधान्य पुरवित आहे. गव्हाऐवजी पीठ देण्याच्या मागणीवर महंत ठाम राहिले. यावर पालकमंत्र्यांनी चारही सेक्टरमध्ये पीठ गिरण्या देण्यात येणार असून त्यांची संख्या वाढविली जाईल, असे आश्वासन दिले. साधुग्राममधील नळाच्या तोटय़ा खराब झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यात त्यांचे काय हाल होतील, अशी विचारणा महंतांनी केली. अखेरीस महाजन यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांची भेट घेतली. १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्यावर ग्यानदास महाराजांनी सर्व कामांबाबत समाधानी असल्याचे सांगत माध्यमांशी बोलणे टाळले.
सिंहस्थ कामांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुप्त लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. भुजबळ यांनी सर्व महंतांची भेट घेतल्यानंतर भाजपचे आमदार प्रा. देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी साधुग्राममध्ये धाव घेत संवादाचा पूल साधण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader