परभणी: खास पारंपरिक वेशात आणि गीते व नृत्यांच्या साथीने बंजारा समाजात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बंजारा भगिनींसोबत होळीचा सण साजरा केला. श्रीमती बोर्डीकर यांनी बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून मतदारसंघातील काही तांड्यांवर होळी साजरी केली.
जिंतूर तालुक्यातील आडगाव तांडा, गणेशनगर तांडा,साईनगर तांडा,पिपंळगाव काजळे तांडा या ठिकाणी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी होळीच्या उत्सवात सहभाग घेतला.बंजारा समाजाच्या भगिनींसोबत त्यांनी होळी साजरी केली. पारंपरिक नृत्य, लेंगी गीते, रंगोत्सव हे वैशिष्ट्य असलेली अनोख्या पद्धतीची होळी साजरी करण्यासाठी महिला भगिनींसह नागरिक मोठ्या उत्साहाने हा उत्सवात सहभागी झाले होते.
जिंतूर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे. अनेक गावांमध्ये या समाजाचे प्राबल्य आहे. दरवर्षी होळीचा सण बंजारा समाजात अत्यंत उत्साहाने साजरा होतो. केवळ एकच दिवस नव्हे तर बंजारा समाज फाल्गुन महिन्यातले अनेक दिवस हा सण साजरा करतो. प्रत्येक तांड्यावर या गीताचे स्वर कानी पडतात. रब्बी हंगाम आटोपल्याने शेतातली सर्व कामे आवरलेली असतात. सुगी संपत आल्याने एक निवांतपणा ग्रामीण भागात दिसून येतो. यानिमित्ताने गीते व नृत्य याच्या जोडीने महिला भगिनी होळीच्या उत्सवाचा आनंद घेतात. श्रीमती बोर्डीकर यांनी आपल्या मतदारसंघातील काही तांड्यांवर जाऊन महिला भगिनींसोबत नृत्यात सहभागी होऊन या पारंपरिक सणाचा आनंद घेतला.
बंजारा समाजाच्या भगिनींचे पारंपरिक वेष आणि विशिष्ट पद्धतीचे मोहक नृत्य मनाला भुरळ पाडणारे आहे. आज उत्सवात सहभागी होत असताना बंजारा समाजातील माता भगिनींच्या आग्रहास्तव पारंपरिक वेशात नृत्य करण्याचा आनंद घेतला. उपस्थित जनसमुदायला होळीच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यात आनंद आणि उत्साहाने सकारात्मक ऊर्जेने एकसाथ काम करण्याचे आवाहन केले अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिली.