जिल्हा नियोजन समिती बठकीला २ तास उशिराने येऊनही पालकमंत्री पंकजा मुंडे सभागृहात न येता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे कळताच वाट पाहत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार, पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत बठकीवर बहिष्कार टाकला, तर प्रशासकीय यंत्रणेने पत्रकारांना अवमानकारक वागणूक दिल्याने पत्रकारही मंत्र्यांच्या पत्रकार बठकीवर बहिष्कार टाकून निघून गेले. मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच बठकीत प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदार वर्तणुकीने माजी आमदारांसह पत्रकारांनाही नाहक त्रास सहन करावा लागल्याने प्रशासनावर पालकमंत्र्यांचे कसलेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या वार्षकि आराखडा मंजुरीसाठी पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात शुक्रवारी दुपारी १ वाजता बठकीचे आयोजन केले होते. नियोजित वेळेनुसार राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, महेंद्र गर्जे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व भाजपचे आमदार, नियोजन समिती सदस्य उपस्थित झाले. सर्व जण मंत्र्यांची वाट पाहत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्याशी चर्चा करीत होते.
दोन तासांनंतर मंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. मात्र, त्यांनी सभागृहात न येता बठक कक्षात भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली. याची माहिती कळताच संतप्त झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांनी पालकमंत्र्यांना वेळेचे भान नाही, दुष्काळाचे गांभीर्य नाही, असा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन बठकीवरच बहिष्कार टाकला व ते तेथून निघून गेले. विरोधी पक्षांचे नेते निघून गेल्याचे कळताच मंत्र्यांनी सभागृहात येत बठक सुरू केली.
दरम्यान, बठकीनंतर पत्रकार बैठक होणार असल्याचे निरोप जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत माध्यमांना देण्यात आले. दिलेल्या वेळेनुसार माध्यम प्रतिनिधी चारच्या सुमारास उपस्थित झाले. मात्र, पोलीस प्रशासनाने पत्रकारांना प्रवेशद्वारावरच तासभर ताटकळत ठेवले. मंत्र्यांना निरोप पाठवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पत्रकारांनीही बहिष्कार टाकला. जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांना अडवण्यात आले. त्यांनी आपली ओळख दिल्यानंतरही पोलिसांनी त्यांना बाजूला ढकलले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पालकमंत्री झाल्यानंतर मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या पुढील वर्षांच्या (२०१५-१६) वार्षकि आराखडा मंजुरीसाठीची पहिली बठक होत असल्याने कार्यकत्रे मोठय़ा संख्येने आले होते. मात्र, पोलिसांनी जिल्हाधिकारी परिसरात बंदोबस्ताचा अतिरेक केला. संचारबंदी लागू करावी, अशा पद्धतीने पोलीस तनात करून लोकांना अडवून धरले. जिल्हाधिकारी कार्यालयातून काही मोजक्या लोकांची फोटोसह यादी पोलिसांना देण्यात आली. यादी व फोटो पाहूनच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे पहिल्याच बठकीत पालकमंत्री मुंडे यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले.
मंत्र्यांनी जाणीवपूर्वक उशीर केला – धनंजय मुंडे
पालकमंत्री मुंडे यांनी वेळेवर न येता जाणीवपूर्वक उशीर करून इतर लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवले. दोन तास उशिरा आल्यानंतरही भाजप पदाधिकाऱ्यांशीच चर्चा केली. जिल्ह्याच्या विकासकामांच्या नियोजनाची बठक असल्याने सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी वेळेवर आले होते. पण पालकमंत्र्यांना वेळेचे भान नाही. आम्ही लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून काही वेळ थांबलो. मात्र, मंत्र्यांचा उद्देश लक्षात आल्याने लेखी पत्र देऊन बहिष्कार टाकून निघून आलो. वेळेबाबत व दुष्काळाबाबतही मंत्र्यांना गांभीर्य नसणे चुकीचे असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
बहीण-भावाच्या बंदोबस्तास
दीडशे पोलिसांचा फौजफाटा!
जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बठकीला पालकमंत्री पंकजा मुंडे, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राजकीय विरोधक असलेले बहीण-भाऊ येणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या साठी पोलीस प्रशासनाने दीडशे पोलिसांचा फौजफाटा तनात केला होता. अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अतिरिक्त अधीक्षक माधव कारभारी, ५ उपअधीक्षक, ४ निरीक्षक, ३५ उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व सव्वाशे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तनात केला होता. त्यामुळे शासकीय विश्रामगृह व जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते.

Story img Loader