वाई: शिंदे-फडणवीस सरकारने शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या शंभर दिवसांत आम्ही अनेक जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यासाठी सातशे शासन निर्णय (जीआर) काढले. यपूर्वी कधीही जनतेच्या हिताचे निर्णय निघाले नव्हते, अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री देसाई यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना, भाजपच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांत आमच्या सरकारने जनतेच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी ७०० शासन निर्णय काढण्यात आले. यापूर्वी कधीही लोकहिताचे शासन निर्णय निघाले नव्हते. समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्टचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी पूर्ण करणार आहोत.
हेही वाचा >>> ऐन दिवाळीत लोकांचा खिसा होणार रिकामा; गहू, ज्वारीचे दर गगनाला भिडले, किलोमागे झाली ‘इतकी’ वाढ
तोपुढे गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडे तेरा हजार रुपये आणि बागायतीसाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीची दोन हेक्टरपर्यंत मुदत तीन हेक्टरपर्यंत वाढवली आहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील तीन लाख ८५ हजार १०१ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्या माध्यमातून त्यांना ८८० कोटींची मदत झाली आहे.
कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे काम बंद पडू देणार नाही. यापूर्वी शासनाच्या जागेवर करार तत्वावर जे कुटुंबिय व गाळेधारक राहिलेत. त्यांच्याशी चर्चा केली जाईल.
या बाबतीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल. यापुढे जर कोणी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला
जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून तीन जनता दरबार घेणार असून हा दरबार सर्वांना खुला राहणार आहे. त्यासाठी अधिकारी उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.
अंधेरीच्या पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून एकत्र लढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो उमेदवार देतील त्याचा आम्ही निश्चितच प्रचार करू,असे त्यांनी स्पष्ट केले.
कोयनानगरला एनडीआरएफच्या धरतीवर पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी महसूलची जागा उपलब्ध असून त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय जिल्ह्यात सर्व सुविधांनी युक्त अशी १५ मॉडेल स्कुल आणि १७ प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यासाठी शासन, जिल्हा नियोजनतून निधी देणार आहोत. पाटण तालुक्यातील आपत्तीग्रस्त नऊ गावांसाठी शंभर टक्के नागरिकांचे पुनर्वसन होण्याकरता शासनाने पाच कोटी जागा खरेदीसाठी ठेवले आहेत.
तेथे नागरिकांना साडेपाचशे घरे एमएमआरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून बांधून दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांसाठी ७७५ कोटी मंजूर केल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साडेसातशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.