सांगली : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे निकटचे सहकारी तथा भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्राचे माजी प्रचारप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिरज विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

पालकमंत्री खाडे यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळख असलेले आणि खाडे यांच्या जत व मिरज विधानसभा निवडणुकीत प्रमुख सहकारी म्हणून काम करणारे प्रा. वनखंडे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, विद्यमान मंत्री व सलग चार निवडणुका खाडे यांनी जिंकल्या असल्याने त्यांना वगळून अन्य कोणाच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचा त्याग करून त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा >>>प्रतापगडाच्या संवर्धनाचे ‘युनेस्को’कडून कौतुक

कोल्हापूर येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रा. वनखंडे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. प्रा. वनखंडे यांनी कोल्हापूर येथील लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या संविधान सन्मान सभेस हजेरी लावली.