धाराशिव: वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर चांगलाच गाजतो आहे. एक निलंबित पोलीस निरीक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी चक्क पोलीस अधीक्षकांच दमबाजी केली आहे. कार्यकर्त्यांच्या घोळक्यात दमबाजी करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही अवमानकारक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
धाराशिव येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. या पदावर येण्यासाठी इच्छुक असलेले निलंबित पोलीस निरीक्षक मोरे यांनी थेट पालकमंत्री सावंत यांच्याकडूनच दबाव आणल्याचे बोलले जात आहे. आंबेजोगाई येथे अवैद्य धंद्यांना अभय, आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात कुचकामी ठरलेल्या मोरे यांच्यावर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः निलंबनाची कारवाई केली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये निलंबित झालेल्या मोरे यांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या नियुक्तीसाठी जोरदार फिल्डिंग लावली. त्यासाठी सावंत यांनी चक्क कार्यकर्त्यांच्या घोळक्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दमबाजी केल्याचा व्हिडीओ आता समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा-जायकवाडीला पाणी देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, मेंढेगिरी समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी
व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका किती दिवसांपूर्वीचा आहे हे यातून स्पष्ट होत नाही. मात्र साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. “धारशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून वासुदेव मोरे यांची नियुक्ती करा, त्यांची ऑर्डर आजच्या आज काढा, मी सांगेल ते करायचं. मी मुख्यमंत्र्याचं देखील ऐकत नाही, ” अशी दमबाजी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सार्वजनिक ठिकाणी केली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
निलंबित पोलीस निरीक्षकावर जिल्ह्याची जबाबदारी
अवैध मद्यविक्री करणारांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना शासनाने १८ ऑगस्ट २०२२ रोजी निलंबित केले होते. भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत त्यासाठी लक्षवेधी उपस्थित केली होती. आता त्याच निलंबित पोलीस निरीक्षकाला धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि त्यासाठी मंत्री सावंत यांनी केलेल्या दमबाजीचा व्हिडीओ समोर आल्याने त्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.