रत्नागिरी : रत्नागिरीच्या राजकिय मैदानावर सलग पाच वेळा राज्य गाजवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांना क्रिकेट खेळाच्या मैदानावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याकडून हार मानावी लागली. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग इलेव्हन आणि पालकमंत्री उदय सामंत इलेव्हन यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात २५ धावांनी सामंत यांच्या संघाचा पराभव झाला.

रत्नागिरी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचा एक अनोखा क्रिकेट सामना प्रेक्षकांना पहायला मिळाला. रविवारी सकाळी झालेल्या या सामन्यात जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह इलेव्हनने पालकमंत्री डॉ. उदय सामंत इलेव्हनचा २५ धावांनी पराभव केला. ६ षटकांचा खेळविण्यात आलेल्या या सामन्यात जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी यांच्या संघाने फलंदाजी करत सामंत इलेव्हन समोर ५७ धावांचे लक्ष्य उभे केले. जिल्हाधिकारी इलेव्हनच्या फलंदाजांनी सामंत इलेव्हनच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पालकमंत्री उदय सामंत इलेव्हनच्या खराब कामगिरीमुळे २५ धावांनी हार पत्करावी लागली.

खेळवण्यात आलेल्या या सामन्यात जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी स्वतः दोन विकेट घेत सामन्यावर आपलं वर्चस्व मिळविले. जिल्हाधिकारी संघाच्या भेदक गोलंदाजी पुढे पालकमंत्री उदय सामंत यांचा संघ गार झाला. यावेळी हा सामना पाहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी वर्गासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि प्रेक्षकांनी गर्दी केली होती.