पालकमंत्री जाधव, आ. चव्हाण यांचे स्थान भक्कम;
माजी आमदार नातू, माने, बनेंचे भवितव्य धोक्यात
गतसप्ताहात झालेल्या गुहागर व देवरुख नगरपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव व चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी आपापल्या मतदारसंघातील स्थान पूर्वीपेक्षा अधिक भक्कम केल्याचे तर त्याच वेळी भाजपचे डॉ. विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र माने व काँग्रेसचे सुभाष बने या तीन माजी आमदारांचे राजकीय भवितव्य मात्र संपुष्टात आल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
गुहागर हा भाजपचा बालेकिल्ला. त्यातच असगोलीवासीयांचा नगरपंचायतीत सामील होण्यास तीव्र विरोध, या पाश्र्वभूमीवर ही नगरपंचायत भाजप सहजगत्या जिंकणार असा अंदाज अनेकांनी वर्तवून पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीकाही केली होती. परंतु झाले उलटेच! राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी तब्बल ११ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. तर १५ जागा लढविणाऱ्या भाजपच्या पदरात केवळ ६ जागा पडल्या. युतीचा मित्रपक्ष शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही. स्वबळाची खुमखुमी असलेल्या काँग्रेस पक्षाची तर या निवडणुकीत पार वाताहतच झाली. भाजपला मिळालेल्या ६ पैकी ४ जागा असगोलीवासीयांच्या पालकमंत्री जाधव यांच्यावरील नाराजीतून मिळाल्या आहेत. अन्यथा या पक्षाची बालेकिल्ल्यातच केविलवाणी स्थिती झालेली दिसून आली असती. एकूणच पालकमंत्री जाधव हे गुहागर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा तिरंगा फडकावण्यात यशस्वी झाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे स्थान पूर्वीपेक्षाही अधिक भक्कम झाले आहे. तर त्याच वेळी भाजपच्या बालेकिल्ल्याचे अनभिषिक्त राजे डॉ. विनय नातू यांच्या राजकीय भवितव्याला ओहोटी लागली असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.
देवरुखात आ. चव्हाणांचा करिष्मा; माने-बने निष्प्रभ
१९९० सालापासून देवरुख-संगमेश्वर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असून येथून माजी राज्यमंत्री शिवसेनेचे रवींद्र माने तीन वेळा तर माजी आमदार सुभाष बने हे दोन वेळा (एकदा शिवसेनेच्या तर दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर) निवडून आले होते. दरम्यान झालेल्या राजकीय उलथापालथीत माने राष्ट्रवादी पक्षात तर बने काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु या मतदारसंघातील, विशेषत: देवरुख शहरातील, त्यांचे समर्थक शिवसेनेच्या पाठीशीच उभे राहिले. याचे प्रत्यंतर गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला मिळालेल्या नेत्रदीपक विजयावरून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीतही यापेक्षा वेगळे काही घडणार नव्हते व नेमके तसेच झाले. या नगरपंचायतीच्या १७ पैकी १२ जागा (शिवसेना ७, भाजप ५) जिंकून युतीने सत्ता काबीज केली. तर राष्ट्रवादीचे ३, काँग्रेस व कुणबी सेना यांचे प्रत्येकी १ उमेदवार निवडून आले.
या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्र पक्ष राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वबळ अजमावून आत्मघात करून घेतल्याची चर्चा काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त करतानाच माजी राज्यमंत्री रवींद्र माने व माजी आमदार सुभाष बने यांच्यातील श्रेष्ठत्वासाठी सुरू असलेली स्पर्धा काँग्रेस आघाडीला मारक ठरली आहे.
विशेष म्हणजे माजी आमदार बने यांना आपले बंधू बारक्या बने यांनाही या निवडून आणता आले नाही.
देवरुख नगर पंचायतीच्या निवडणुकीत युतीला मिळालेले निर्विवाद बहुमत अपेक्षित असले तरी त्यामुळे चिपळूण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण यांची या मतदारसंघावरील पकड अधिक मजबूत झाली असल्याचे, तर माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीचे रवींद्र माने व काँग्रेसचे माजी आमदार सुभाष बने यांचे राजकीय भवितव्य संपुष्टात आल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
गुहागर, देवरुख नगरपंचायत निवडणूक :
पालकमंत्री जाधव, आ. चव्हाण यांचे स्थान भक्कम; माजी आमदार नातू, माने, बनेंचे भवितव्य धोक्यात गतसप्ताहात झालेल्या गुहागर व देवरुख नगरपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव व चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी आपापल्या मतदारसंघातील स्थान पूर्वीपेक्षा अधिक भक्कम केल्याचे तर त्याच वेळी भाजपचे डॉ. विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र माने व काँग्रेसचे सुभाष बने या तीन माजी आमदारांचे राजकीय भवितव्य मात्र संपुष्टात आल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा
First published on: 09-04-2013 at 04:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guhaghar devrukh nagar panchyat election