राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळालेला असताना त्यापाठोपाठ शुक्रवारी संध्याकाळी उशीरा राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळेही खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली होणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर विरोधकांकडून आणि काही स्थानिक संस्थांकडून होणारी मागणी मान्य झाली आहे. तसेच, शाळांपाठोपाठ सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे वगळता राज्यात फारसे निर्बंध लागू नसतील. नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांनाही लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

करोनाची दुसरी लाट आल्यावर गेल्या एप्रिलमध्ये सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्याने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रार्थनास्थळांसाठी काय असतील नियम?

दरम्यान, प्रार्थनास्थळे खुली केली जाणार असली, तरी त्यासाठी सरकारने नियमावली देखील घालून दिली आहे. त्यानुसार…

१. ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरीक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. करोना नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं संबंधित प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन कर्मचारी आणि भेट देणाऱ्या नागरिकांनी पालन करायचं आहे.

२. शक्य त्या सर्व ठिकाणी किमान ६ फुटांचं अंतर पाळावं. यादरम्यान, तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असेल. साबणाने किमान ४० ते ६० सेकंद किंवा अल्कोहोलवर आधारीत सॅनिटायझरने किमान २० सेकंद हात वारंवार धुवावेत.

३. थुंकण्यावर सक्त मनाई असेल. असं केल्यास त्यावर दंड आकारण्याचे निर्देश प्रार्थनास्थळांना देण्यात आले आहेत. तसेच, आरोग्य सेतू मोबाईल अॅप इन्स्टॉल करण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे.

४. प्रत्येक प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर असावे.

५. प्रार्थनास्थळाच्या आवारात येण्यासाठी फक्त लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. तसेच, फक्त मास्क किंवा फेस कव्हर घातलेल्या लोकांनाच प्रार्थनास्थळात प्रवेश मिळेल.

६. सर्व प्रार्थनास्थळांमध्ये करोनाविषयी जागृती आणि सूचना देणारे फलक लावणं बंधनकारत असेल.

७. कोणत्याही प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय संबंधित प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती वा ट्रस्टने घ्यायचा आहे. हा निर्णय प्रार्थनास्थळाचा आकार, हवेशीरपणा, भाविकांमध्ये ६ फूट अंतर ठेवण्याच्या नियमाचं पालन या बाबी समोर ठेऊन घेतला जावा. या निर्णय प्रक्रियेत स्थानिक प्रशासन देखील सहभागी असेल.

८. भाविकांनी आपले जोडे आपापल्या वाहनांमध्येच काढावेत. गरज भासल्यास, त्यांनी स्वत:च आपापले जोडे नेमून दिलेल्या जागेत स्वतंत्र ठेवावेत.

९. प्रार्थनास्थळाच्या पार्किंगच्या जागेत आणि आजूबाजूला करोनाच्या नियमांना अनुसरून योग्य प्रकारे गर्दीचं नियंत्रण केलं जावं.

१०. प्रार्थनास्थळांच्या बाहेर असणारे कोणतेही ठेले, पथारीवाले, फेरीवाले किंवा दुकानदार यांनी करोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करायला हवं.

११. प्रार्थनास्थळांमध्ये येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं आणि प्रमाणाचं नियोजन करण्यासाठी ठराविक अंतरावर मार्किंग्ज करून रांगा लावण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो.

१२. प्रार्थनास्थळामध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असावेत. प्रार्थनास्थळात येताना भाविकांनी त्यांचे हात आणि पाय साबणाने धुवूनच प्रवेश करावा. एकमेकांना भेटताना प्रत्यक्ष स्पर्श टाळावा.

१३. प्रार्थनास्थळांमध्ये बसण्याची व्यवस्था अशी करावी जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल. अशा ठिकाणी एसीचं टेम्परेचर सेटिंग हे २४ ते ३० डिग्री सेल्सिअरदरम्यान असावं. आर्द्रतेचं प्रमाण ४० ते ७० टक्के असावं. क्रॉस व्हेंटिलेशन आणि भरपूर शुद्ध हवा आवारात असायला हवी.

१४. प्रार्थनास्थळावर कोणतीही मूर्ती, पुस्तक यांना हात लावण्याची परवानगी भाविकांना नसेल. मोठी गर्दी किंवा एकत्र जमण्यावर बंदी असेल.

१५. प्रार्थनास्थळी गर्दी टाळण्यासाठी गाण्यांचे रेकॉर्डिंग्ज वाजवण्यात यावेत. प्रत्यक्ष गाणारे गट बोलावू नयेत.

१६. प्रार्थनास्थळी सर्व भाविकांनी प्रार्थनेसाठी लागणारी स्वतंत्र चटई (पद्धत वा प्रथा असल्यास) आणावी. एकाच चटईवर सर्वांनी बसू नये. तसेच, प्रसाद वाटप वा पवित्र जल फवारणी या गोष्टींवर बंदी असेल.

१७. प्रार्थनास्थळी नियमित अंतराने सॅनिटायझेशन आणि स्वच्छता केली जावी. विशेषत: जमीन सातत्याने स्वच्छ केली जायला हवी.

१८. स्वच्छतागृहे आणि खाण्याच्या ठिकाणी गर्दीचं योग्य नियोजन केलं जावं.

१९. जर एखादी व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्या व्यक्तीला स्वतंत्र खोलीत किंवा विलगीकरणात ठेवावं. डॉक्टरांनी त्या व्यक्तीची तपासणी करेपर्यंत तिने मास्क घालून ठेवावा. व्यवस्थापनाने तातडीने याची माहिती नजीकच्या आरोग्य सुविधा केंद्र वा रुग्णालय वा क्लिनिकला द्यावी. संबंधित व्यक्तीवर आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तो निर्णय झाल्यानंतर संपूर्ण आवारात पुन्हा एकदा सॅनिटायझेशन करावे.

Story img Loader