महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पश्चिम बंगालमध्ये काही गुंतवणूक वळवण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मदत करत असल्याची शंका भारतीय जनता पक्षाने बुधवारी व्यक्त केली होती. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीसानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरे आणि ममतांच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे. हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता.
आशिष शेलार यांनी ट्वीट केलं असून इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास ममता बॅनर्जींना शिवसेना मदत करतेय का? असा सवाल विचारला होता. इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का? अशीही विचारणा त्यांनी केली.
त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर बनण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. भाजपाच्या टिकेनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी वृत्तपत्रातील एका जाहिरातीचा फोटो सोबत दिला आहे.
“भाजपाचे बेगडी मुंबई प्रेम. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज व्हायब्रंट गुजरातसाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय. आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून,” असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बुधवारी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे यांनी संगळवारी भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्यावतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना शिजलं? असा सवाल शेलार यांनी केला होता.
“ममता बॅनर्जींचे महाराष्ट्रात सरकारी पक्षांनी स्वागत केले. ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे. पण त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्नेह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात. तुमचा कौटुंबिक स्नेह असेलही. आम्हाला त्याबद्दल काय करायचे आहे? पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय सबंध? बांगलादेशी नागरिकांना संरक्षण देणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध?” असा सवाल शेलार यांनी केला होता.