महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती समाजाविषयी एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात या वक्तव्याचा समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, ” राज्यपाल कोश्यारी नाही का म्हणाले होते की महाराष्ट्रातले गुजराती आणि मारवाडी निघून गेले तर महाराष्ट्र काय करेल? मूळात पहिल्यांदा ते गुजराती मारवाडी त्यांच्याकडे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले ना? महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा जी काही जडणघडण झाली आहे त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक लोक बाहेरून आले, उद्योजक झाले, मोठे झाले. हे आपल्याला कसं नाकारता येईल?” असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उत्तर दिलं. पुण्यातल्या व्याख्यान कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
अमिताभ बच्चन अलाहाबादलाच राहिले असते तर?
मला सांगा अमिताभ बच्चन अलाहाबादलाच राहिले तर काय झालं असतं आज? ते मुंबईत आले. मुंबईल्या आल्यानंतर त्यांनी संघर्ष केला. ते मोठे झाले. त्यांच्यात टॅलेंट होतंच. कित्येक हिरो, हिरॉईन्स महाराष्ट्रात आले त्यांनी इथे त्यांचं आयुष्य घडवलं. आम्ही मात्र शांत बसलो आहोत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय वक्तव्य केलं होतं?
कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसले होते. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्यानंतर आता त्यांनी अखेर माफी मागितली. आज हाच संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी त्यांना खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
निवडणूक म्हणजे राजकारण नाही
निवडणूक म्हणजेच राजकारण आहे असं नाही. अनेक गोष्टी आहेत. ज्या राजकारणात आल्यानंतर करता येतात. आपल्या लोकांनी शांत राहून चालणार नाही. तरूणांनी राजकारणात आलं पाहिजे. अनेक विविध गोष्टी आहेत. ज्या करता येऊ शकतात त्यामुळे तरूणांनी राजकारणाकडे पाठ फिरवायला नको असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
या क्षेत्रात काम करण्यासाठी वयाचं बंधन नाही. माझी साठी झाली म्हणून गप्प बसू नका. तुम्हाला व्यक्ती आवडो किंवा न आवडो एम. एफ. हुसैन यांचं करिअर वयाच्या साठाव्या वर्षी सुरू झालं. माझी सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे की तुम्ही राजकारणात यायला हवं. आत्ता जे काही सुरू आहे ते जर बदलायचं असेल तर तुमचा सहभाग राजकारणात आवश्यक आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वारसा वगैरे राजकारणात असावा लागतो असं काहीही नसतं. काही जण प्रयत्न करतात पण आपल्याला कालांतराने कळतं काय झालं आहे. वारसा नसलेले अनेक लोक राजकारणात यशस्वी झालेत हे विसरू नका. त्यामुळे मी इतकंच सांगेन फक्त घरात बसून बोटं मोडत राहू नका. ही गोष्ट महाराष्ट्राच्या हिताची नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.