मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील एका कार्यक्रमातून जोरदार टोलेबाजी केली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षात असताना पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय कसे ओढले जात होते, याचा खुलासाही त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवाजी पार्कवरून भाषण करण्यास बंदी घातली होती, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
यावेळी गुलाबराव पाटलांच्या भाषण कौशल्याचं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गुलाबराव पाटील हे आपल्या शिवसेनेची बुलंद तोफ आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. त्यामुळेच मी त्यांना ठाणे, पालघर अशा सर्वच जिल्ह्यात निवडणुकीसाठी बोलवत असतो. त्यांना बोलवल्यानंतर तेही लगेच येतात. ते जेव्हा शिवाजी पार्कवर भाषण करायचे, तेव्हा ते कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करायचे. माझ्यापेक्षा त्यांचं भाषण चांगलं होईल, त्यांनाच क्रेडिट मिळेल, म्हणून काहींनी गुलाबराव पाटलांचं शिवाजी पार्कवरील भाषण बंद केलं होतं, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचा बोलण्याचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता.
हेही वाचा- “होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले…
एकनाथ शिंदे हा कद्रू मनाचा नाहीये. एकनाथ शिंदे हा कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता आहे. गुलाबराव पाटील चांगलं भाषण करतात हा त्यांचा गुन्हा आहे का? मग त्यांच्या भाषणावर का बंदी घातली? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
हेही वाचा- “महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
गुलाबराव पाटलांना उद्देशून एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनेत असताना गुलाबाला काटे टोचण्याचं काम कुणी केलं? गुलाबरावाचे पाय ओढण्याचे काम कुणी केलं? हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मंत्रीपद देतानाही काय-काय करावं लागलं? याचा साक्षीदार मी स्वत: आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढं काम केलं नाही, तेवढं काम आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केलं. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. ते जळगाव येथील पाळधी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यातील जाहीर कार्यक्रमात बोलत होते.