शिवसेना पक्षातर्फे शिवाजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन्ही बाजूने शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी दोन्ही गटाने महापालिकेकडे अर्ज केलेला आहे. असे असताना शिंदे गटातील नेते तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मैदान तसेच कोणत्याही पार्कवर कोणाची मालकी नसते. ही सर्वजनिक मालमत्ता आहे. महापालिका ज्यांना परवानगी देईल, तोच गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> “त्यांच्या डोक्यात हवा गेली, माझ्याशी पंगा..,” भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेनंतर रामदास कदम आक्रमक; संघर्ष शिगेला
दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज अद्याप महानगरपालिकेकडे प्रलंबित आहे. महापालिकेकडे अर्ज केलेला आहे. कोणताही पार्क किंवा मैदान हे कोणाच्याही मालकीचे नसते. ती सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे पालिका ज्यांना परवानगी देईल, त्यांचीच सभा शिवाजी पार्कवर होईल. शिवतीर्थ याचं आहे, त्याचं आहे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> …म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळेच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी शिवाजीपार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजीपार्कमध्ये मेळावा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बीकेसीमधील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला एमएमआरडीने परवानगी दिली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही.