Gulabrao patil speech: “प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करू नका. शरद पवारांवर बोलू नका, आपली ती लायकी नाही. पण संजय राऊतवर बोला, तो आपला माल आहे. मी कधीच उद्धव ठाकरेंवर टीका करत नाही. त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बोलतील. ती माझी लायकी नाही. शरद पवारांवर टीका करण्याएवढा मोठा माणूस मी झालेलो नाही. मी माझ्या पातळीवर असेलल्या माणसावरच टीका करतो. त्यामुळे मी कार्यकर्त्यांनाही हाच संदेश देईल. कार्यकर्त्यांनीही आपली लायकी पाहूनच बोलावे”, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राजकारणात टीका करताना आपल्या बरोबरीच्या नेत्यांवर बोलावे, असे त्यांना सुचवायचे होते.
विधानसभेला ५२ दिवस उरले
जळगावमधील धरणगाव तालुक्यात संघटनेच्या बैठकीत बोलत असताना गुलाबराव पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीला ६० दिवस उरले असे कुणी म्हणत असेल. पण आता केवळ ५२ दिवस उरले आहेत. मतदारसंघात १८१ गावे आहेत. दोन नगरपालिका आहेत. त्यामुळे भाजपावाल्यांशी नीट बोला. जळगावमधील पाचही आमदार निवडून येतील, ही जबाबदारी एकनाथ शिंदेंनी आपल्यावर टाकली आहे.
हे वाचा >> Video: छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगणारे नितीन गडकरी यांचे जबरदस्त भाषण; व्हिडीओ व्हायरल
२०१९ ला नाईलाजाने झाडी, डोंगर पाहावे लागले
२०२२ साली आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ राहून उठाव केला होता. मी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नसता तर आज मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आला नसता. काल संजय राऊत जळगावमध्ये येऊन गेले. ते म्हणाले, ४० आमदारांसमोर आम्ही ४० शिवसैनिक उभे करणार. पण हे सर्व पळपुटे आहेत. आमच्यासमोर यांना आयात उमेदवार आणावे लागतील, असे आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले.
माझा क्रमांक ३३ वा…
एकनाथ शिंदेंबरोबर जेवढे आमदार गेले, त्यात माझा क्रमांक ३३ वा आहे. माझ्या आधी अनेकजण गेले. मी तेव्हा उद्धव ठाकरेंकडे गेलो. त्यांना म्हणालो, एकनाथ शिंदे आमदार घेऊन वापीपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना बोलावून घ्या. त्यांना आपण थांबवू शकतो. तेव्हा तिथे बसलेल्या काही चमच्यांनी सांगितले, काही गरज नाही. तुम्हाला जायचे असेल तर जा. तेव्हा आम्ही आमची बॅग भरली. मग आम्हीही झाडी, डोंगर पाहण्यासाठी निघालो, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.