ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही २६ आणि २७ जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसारीत होणार आहे. या मुलाखतीचा पहिला टीझर समोर आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडल्याचं दिसत आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना खेकड्यांची उपमा दिली आहे. माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी धरण फोडलं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
“खेकडा हा अत्यंत गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीळ झालेली असते, त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरणच फुटलं नसते,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. ते मुंबईत विधानभवनाबाहेर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “माझं सरकार पावसात वाहून गेलं नाही, खेकड्याने धरण….”, आला उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीचा टिझर
मी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरही गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. “निश्चितपणे बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे आहेत, हे ते जरी मान्य करत असले तरी, आपण कुणाबरोबर युती करत आहोत आणि आपल्या बाजुला कोण बसलंय? हेही बघणं गरजेचं आहे,” असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
हेही वाचा- “माझ्या मतदारसंघात १०० कोटींचा निधी, पण कुणाला दिला माहीत नाही”, निधी वाटपावरून आव्हाडांचं टीकास्र!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीला मुजरा करायला जातात, या उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री कुटुंबासह पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्याला मुजरा मारणं म्हणत असाल तर ती चुकीची बाब आहे. मागच्या काळात आपणही त्यांना (पंतप्रधान) भेटायला जात होतात. पण आम्ही म्हणणार नाही की, आपण मुजरा मारायला जात होतात. आपण रामराम करायला जात होतात, असं मला वाटतं.”