सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची भविष्यवाणी केली आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडलेला एकही नेता पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवारांनी केली होती.
अजित पवार यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सकाळी कुणाबरोबर तरी शपथ घेतात, संध्याकाळी कुणाबरोबर जातात, अशांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- औरंगाबाद अन् उस्मानाबादनंतर अहमदनगरचंही होणार नामकरण?, गोपीचंद पडळकरांचं सूचक विधान; म्हणाले…
अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, शेवटी जनता हुशार आहे. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, ते कितपत लागू होतं, हे त्यांनीच तपासून बघावं. हे सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणाबरोबर जातात. तिसऱ्या दिवशी कुणाबरोबर सरकारमध्ये बसतात. अशांनी आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
हेही वाचा- येत्या दोन दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होणार? २० आमदारांबाबत उदय सामंत यांचं मोठं विधान!
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले आहेत. त्यातील एकही आमदार निवडून येत नाही. नारायण राणेंनी शिवसेना फोडली होती. सगळे बाहेर पडले. त्यानंतर राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. मुंबईत तर त्यांना एका महिलेनं पाडलं. एका बाईनं पाडलं नारायण राणेंना, अशी खोचक टोलेबाजी अजित पवारांनी केली होती.