शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही गटानं मैदान मिळवण्यासाठी एक महिन्याआधीच पालिकेकडे अर्ज केला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरून दोन्ही पक्ष पुन्हा आमने-सामने उभे ठाकले आहेत. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदास संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? प्रत्येकानं एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कार्यकारिणीनं उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड केली.”
हेही वाचा : ओबीसी बैठकीत अजित पवारांबरोबर वाद झाला? छगन भुजबळ म्हणाले, “एका घरात…”
“ही खरी शिवसेना आहे. फुटलेला गट शिवसेना नाही. राज्यात आणि देशात तुमच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही काहीही कराल, असं चालणार नाही. गेल्यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला. यंदाही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल,” असं विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “महाराष्ट्रात नको असलेल्या नेत्यांना…”, लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या योजनेवरून जयंत पाटलांचा टोला
यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, “संजय राऊतांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? हा वाद न्यायालयात गेला आहे. न्यायालय ज्याला न्याय देईल, त्याचा दसरा मेळावा होईल.”