Gulabrao Patil on Dada Bhuse and Bharat Gogawale : महायुतीच्या सरकारने शनिवारी (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे व मुंबई शहराचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळालेलं नाही, तर काहींना त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं नाही म्हणून ते नराज असल्याची चर्चा. यामध्ये शिवसेनेचे (शिंदे) दादा भुसे, भरत गोगावले, राष्ट्रवादीचे (अजित पवार) धनंजय मुंडे व इतर काही मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, भुसे व गोगावले यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही नेत्यांवर अन्याय झाल्याचं पाटील म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबराव पाटील म्हणाले, “मला तिसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी व मान मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालं आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मागील पाच वर्षे या जिल्ह्यात तीन मंत्री होते. परंतु, पालकमंत्रिपद माझ्याकडे होते. या काळात माझ्या हातून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील. परंतु, विकासकामे बघून मला ही संधी दिली आहे. आम्ही तिन्ही मंत्री मिळून जिल्ह्याचा विकास करणार आहोत. आमच्यामध्ये कोणतीही रस्सीखेच नव्हती. मात्र, मंत्री दादा भुसे व भरत गोगावले यांना नक्कीच पालकमंत्रिपद मिळायला हवं होतं. तशी आमची इच्छा होती. त्यांच्यावर निश्चितच अन्याय झाला आहे”.

गिरीश महाजन व आदिती तटकरेंमुळे दादा भुसे व भरत गोगावलेंचा पत्ता कट

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि फलोत्पादन तथा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. दादा भुसे हे नाशिकचं पालकमंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. मात्र जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर, भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद हवं होतं. फडणवीस सरकारमध्ये रायगडची जबाबदारी महिला व बाल कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

रायगडमधील रस्सीखेच तटकरेंनी जिंकली

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेनेत (शिंदे) मोठी रस्सीखेच चालू होती. भरत गोगावले रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही होते. याबाबत त्यांनी अनेकदा अपेक्षाही बोलून दाखवल्या होत्या. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे गोगावलेंच्या नाराजीची चर्चा ऐकायला मिळत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil says dada bhuse bharat gogawale treated unfairly as dont become guardian minister rno news asc