शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांना पक्षातल्या ४० आमदारांचं पाठबळ मिळालं. या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून नंतर शिवसेना पक्षावरच दावा सांगितला. याप्रकरणी निवडणूक आयोगानेही पक्ष, पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं. एक वर्षापूर्वी शिवसेनेत नेमक्या काय काय घडामोडी घडत होत्या, पक्ष का फुटला यावर आजही वेगवेगळ्या चर्चा होत असतात. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (२० जून) पुन्हा एकदा भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जातेय असा विषय आल्यावर आम्हाला वाईट वाटलं. सुरुवातीला जेव्हा काही आमदार गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना (उद्धव ठाकरे यांना) सल्ला देत असेल आणि ते त्याचं ऐकत असतील तर काय होणार. मी तर ३३ नंबरला (फुटलेल्या आमदारांमधले ३३ वे आमदार) गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो.” गुलाबराव एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा >> Video: “एकनाथ शिंदे मला म्हणाले, मी तुला एवढी मदत केली आणि तू…”, आमदार नितीन देशमुखांनी सांगितला त्यांच्या पलायनाचा घटनाक्रम!

गुलाबराव पाटील म्हणाले, मी त्यांना (उद्धव ठाकरे) सांगून गेलो. जाण्यापूर्वी मी त्यांना सांगितलं की, आत्ता फक्त ११ आमदार सुरतला गेले आहेत. आपण त्यांना परत बोलवा. अजित पवारांना पवारसाहेब परत बोलावू शकतात, आपणही आपल्या नेत्यांना परत बोलावलं पाहिजे. आपल्या नेत्याने आपल्या चांगल्या कार्यकर्त्याला गेल्यानंतर परत बोलवायचा प्रयत्न का केला नाही हा माझा सवाल आहे. हा प्रयत्न केला असता तर आमच्यासारख्या लोकांची आणि आमदारांची मनं वळली असती. आम्हाला वाटलं असतं की बाबा हा माणूस (उद्धव ठाकरे) प्रयत्न करतोय, पण हीच लोकं (एकनाथ शिंदे आणि इतर आमदार) ऐकत नाहीत. तो प्रयत्न यांनी केला नाही.

“तुम शेर जैसे दिखते हो, लेकीन…”

पाणी पुरवठा मंत्री म्हणाले, आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो तर उलट मलाच सांगितलं, तुम शेर जैसे दिखते हो, लेकीन दिल चुहे जैसा है, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो. हे संजय राऊतांचं वाक्य आहे. या महामंडलेश्वर १००८ ने पूर्ण शिवसेनेची वाट लावली. त्याच्यामुळेच शिवसेनेला हे दिवस आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil says uddhav thackeray not even tried to stop mlas asc
Show comments