जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना (शिंदे गट) युतीला विरोध करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटलांनी खडसावलं आहे. आम्ही विकासासाठी उठाव केला आहे. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील. असं पाटील पदाधिकाऱ्यांसमोर म्हणाले.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे लोक आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून एकत्र आलो आहोत, त्यांना (भाजपा-शिंदे युतीला विरोध करणारे भाजपा पदाधिकारी) काय बोलायचं ते बोलू द्या. आपण पंतप्रधान मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. ज्यांना ते मान्य नसेल ते आपल्याला विरोध करतील.
पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले की, आपण एक मोठा विचार घेऊन एकत्र आलो आहोत. परंतु छोट्यामोठ्या निवडणुकीसाठी ते (भाजपा) जर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत असलीत तर मोदीसाहेबांसाठी ते धोकादायक आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी शांततेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यावं, एकही शब्द आपण बोलायला नको.
हे ही वाचा >> “संयोगीताराजेंचा अपमान करणाऱ्या महंतांना २४ तासांत अटक करा, अन्यथा…”, अमोल मिटकरींचा सरकारला इशारा
भाजपा-शिंदे युतीला विरोध
आगामी काळात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. पाटील या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. परंतु स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा या युतीला विरोध होत असल्याने पाटील यांनी विरोध करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. यासंबंधीचं वृत्त टीव्ही ९ मराठी वाहिनीने प्रसिद्ध केलं आहे.