एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला असून मुख्यमंत्रीपदासोबतच शिवसेना पक्षप्रमुखपद देखील सोडण्याची तयारी दर्शवली असताना दुसरीकडे शिंदेंच्या गटातील आमदारांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यापैकीच एक आमदार म्हणजे जळगावमधील शिवसेनेचे आक्रमक नेते गुलाबराव पाटील. कट्टर शिवसेना नेते म्हणून ओळख असणारे गुलाबराव पाटील सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एबीपी न्यूजला दिलेल्या एका प्रतिक्रियेचा असून तो नेमका कधीचा आहे, याविषयी खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये संबंधित पत्रकार गुलाबराव पाटील यांना शिवसेनेचे आमदार फुटू शकतात अशी भिती वाटतेय का? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. या प्रश्नावर गुलाबराव पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होऊ लागली आहे.
गुलाबराव पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ३४ आमदार सध्या गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्याशिवाय ८ अपक्ष आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार दोलायमान अवस्थेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर वातवरण चांगलंच तापलं आहे. त्यासंदर्भात शिंदेंसोबत असणाऱ्या इतर आमदारांनी याआधी बंडखोरीसंदर्भात केलेल्या दाव्यांचे व्हिडिओ किंवा ट्वीट व्हायरल होऊ लागले आहेत. असाच एक व्हिडीओ प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
“वेट अँड वॉच”… शिवसेनेचे अजून तीन आमदार फुटल्यानंतर ज्येष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया!
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांना आमदार फुटण्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. “कोई माई का लाल फोड सकता है उनको(आमदार)? फोडना है तो आ जाए सामने. ये सब्जी मंडी थोडी है के कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए.. हिंमत है तो आ के ले जाए”, असं पाटील म्हणाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, याआधी अनेकदा महाविकास आघाडीकडून १६९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला होता. या गणितानुसार एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या जवळपास ४२ आमदारांची संख्या लक्षात घेता सध्या महाविकास आघाडीकडे अवघ्या १२७ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे.