राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्मिल टीप्पणी केली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलाताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागले, हे एखाद्या ब्राम्हणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता, ही वेळी लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राम्हणाचं म्हणणं आहे, अशी मिश्कील टीप्पणीही त्यांनी केली.
अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, अजित पवार यांनीही काल याबाबत स्पष्टीकरण दिलं. “राष्ट्रवादी पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. १० जूनला १९९९ पासून आम्ही काम करतोय. आजही आम्ही काम करतोय, उद्याही करत राहणार. जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार”, असं ते म्हणाले. तसेच “या बातम्या विपर्यास करून दाखवल्या जातात. अशा चर्चा सुरू झाल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज होतात. संभ्रामवस्थेत जातात. परंतु, यात काहीही तथ्य नाही. प्रत्येकाने आपआपलं काम करा, महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.