शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पहिली न्यायालयीन लढाई जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही केवळ तीन तासांची सभा आहे, यासाठी खूप मोठी लढाई जिंकलो म्हणणं योग्य नाही. दसरा मेळाव्यात कुणाकडे जास्त लोकं येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

हेही वाचा- “पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळवून शिवसेनेनं पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे, याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, याला लढाई म्हणण्यासारखं काय आहे? यामध्ये त्यांना न्याय मिळाला आहे. त्यांची सभा शिवाजी पार्कवर झाली पाहिजे, असं न्यायालयाने म्हटलं असेल तर सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. आम्हीही मान्य केलंय. आम्ही आमची बीकेसीमध्ये तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फार मोठी लढाई जिंकलो, असं म्हणण्याची काही गरज नाही. ही केवळ तीन तासांची सभा आहे. दसरा मेळाव्यासाठी कुणाकडे जास्त लोकं येतात, यावर सगळ्यांचं लक्ष आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा- “दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आधीच दिला होता सल्ला पण…”, मनसे नेत्याचा मोठा खुलासा

न्यायालयीन लढाईबाबत गुलाबराव पाटलांनी पुढे सांगितलं की, शिवाजी पार्क आम्हाला मिळावं, यासाठी शिवसेना पक्ष न्यायालयात गेला नव्हता. तिथला एक स्थानिक आमदार न्यायालयात गेला होता. ठाकरे गटाला शिवतीर्थ देऊ नका, अशी मागणी आम्ही केली नव्हती. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. तिथे त्यांची सभा झालीच पाहिजे, फक्त तेथून सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, एवढीच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil statement on uddhav thackeray rally and dasara melava at shivaji park rmm