स्व. वसंतराव झावरे यांच्या पाठोपाठ सॉ. गुलाबराव शेळके व पोपटराव पवार यांचेही निधन झाल्याने पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे सांगतानाच राज्यातील सहकार अडचणीत असताना सॉ. शेळके यांनी महानगर बँक उत्तम स्थितीत चालवून अडचणीच्या काळातही सहकार टिकविल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
सॉ. शेळके व पोपटराव पवार यांच्या निधनानंतर रविवारी पवार यांनी कुंद व सुपे येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पवार म्हणाले, शेळके यांनी शून्यातून विश्व निर्माण करून मुंबईत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्या याच निष्ठेमुळे शिखर बँक तसेच मुंबई बँकेमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. गेल्या सोमवारीच शेळके यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले होते. त्या वेळी प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांना आपण दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी रात्री त्यांच्या निधनाची बातमी आली. पवार यांनी सॉ. शेळके यांच्या पत्नी सुमनताई, मुलगा अॅड. उदय तसेच मुलींचे सांत्वन केले.
सुपे येथे पोपटराव पवार यांच्या कुटुंबीयांचीही पवार यांनी भेट घेतली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले पोपटराव हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आजकाल निष्ठावान कार्यकर्त्यांची संख्या कमी होत असताना पोपटरावांनी मात्र पक्षाचे काम निष्ठेने केले.
पवार यांचे पुत्र दीपक, पत्नी, नातेवाईक या वेळी उपस्थित होते.वसंतराव झावरे यांच्या पाठोपाठ गुलाबराव व पोपटराव यांचे निधन झाल्याचे दु:ख मोठे आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा असून, कार्यकर्त्यांनी पोरकेपणाची भावना ठेवू नये.