सातारा शहराचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरलेला गुलमोहर दिवस रंग, शब्द आणि सुरावटींच्या मैफिलीत साजरा झाला. अभिजित शिंदे यांच्या गुलमोहर चित्राच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.
गेली १५ वर्षे सातत्याने १ मे हा ‘गुलमोहर दिवस’ म्हणून शहरात साजरा केला जातो आहे. या दिवशी उन्हाळ्यात फुलांनी बहरणाऱ्या बहावा, निलमोहर, पांगारा, पळस अशा वृक्षांचे कौतुक आणि पर्यावरण संवर्धनाचा एक प्रयत्न म्हणून साहित्य, कला, संस्कृतीशी नाते जोडत हा उपक्रम साजरा केला जातो. आजपर्यंत अनेक ज्येष्ठ कलाकारांनी या महोत्सवास हजेरी लावली आहे. तसेच सातारा शहर आणि कराड, वाई येथील कलाकार, लेखक, कवी ‘गुलमोहर डे’च्या सकाळी उपस्थित राहून आपली कलाकृती सादर करतात. गुरुवारी श्रीनिवास वारुंजीकर, राजेंद्र घाडगे यांच्या कविता वाचनाबरोबर लहानमोठय़ा सुमारे ७० चित्रकरांनी गुलमोहराच्या विषयावर चित्रे काढली. तर सुमारे चौदा छायाचित्रकारांनी निसर्गाच्या रंगांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले. या महोत्सवाचे अनौपचारिक उद्घाटन कार्यक्रमाच्या पाहुण्या नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांनी केले. या वेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
ओंकार पाटील यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून गुलमोहरावरच्या कवितांना अक्षरबद्ध केले. प्रा. डॉ. विश्वास देशपांडे यांनी निसर्गाच्या कलाकृतीची माहिती शास्त्रीय विवेचनातून दिली. अतुल शहा, सचिन प्रभुणे, डी. एस. कुलकर्णी, विजय धुमाळ, पी. बी. तारु, प्रा. राजन मोरे यांच्या उपस्थितीत मुंबईचे चित्रकार अभिजित िशदे यांनी गुलमोहोराचे अमूर्त शैलीतील चित्र प्रात्यक्षिक म्हणून काढून दाखवले. या चित्राने वाहवा मिळवली. मान्यवरांच्या हस्ते बालकलाकारांचा, चित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
रंग, शब्द, सुरावटींच्या मैफलीत सातारचा ‘गुलमोहर दिवस’ साजरा
सातारा शहराचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरलेला गुलमोहर दिवस रंग, शब्द आणि सुरावटींच्या मैफिलीत साजरा झाला. अभिजित शिंदे यांच्या गुलमोहर चित्राच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

First published on: 03-05-2014 at 03:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulmohar day celebrated in satara