कवी ग्रेस यांनी नावाजलेला सातारा येथील ‘गुलमोहर डे’ कला, साहित्य, संगीताचा उत्सव गुरुवारी साजरा होणार आहे. पंधरा वर्षांपुर्वी १ मे रोजी सुरु झालेला हा उत्सव आता केवळ सातारा जिल्ह्याचेच नाही तर पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण केंद्र झाले आहे.
पंधरा वर्षांपूर्वी सातार्यातील कला, साहित्य, संस्कृतीत काहीतरी वेगळं करु इच्छिणारी मंडळी एकत्र आली. मे महिन्याच्या तप्त सूर्याकडे बेधडकपणे डोळे भिडवून पहाणारा आणि लालभडक रंगांची उधळण करत निसर्गाच्या चमत्काराचा अनोखा आविष्कार म्हणून मिरवणार्या गुलमोहराच्या नावाने हा दिवस साजरा करायचे ठरले. गुलमोहोराबरोबर उन्हाळ्यात बहरणार्या, फुलणार्या वृक्षांचाही यात समावेश करण्यात आला. पण या दिवसाला नाव राहील ते गुलमोहराचेच ! असा हा ‘गुलमोहर डे’ गुरुवारी साजरा होणार आहे. यात गुलमोहराच्या झाडांची चित्रे, छायाचित्रे, कविता, ज्येष्ठ कलावंतांची प्रात्यक्षिके, कॅलिग्रफी, मांडण शिल्प असे उपक्रम आयोजित केले आहेत. दरवर्षी या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर, अजय दळवी, सागर बोंद्रे, विजय टिपूगडे, अभिजित िशदे, शिवाजी तुपे, मुकुंद भालेगर यासारख्या कलावंतांनी या दिवसात आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. कवि ग्रेस यांनी या दिवसाचा उल्लेख अनेक व्याख्यानात केला आहे. ग्रेस यांना या दिवसावर तसेच गुलमोहरावर मनोगत लिहायचे होते. ही इच्छा त्यांनी डॉ. गीता पोळ यांना कळवली होती. एकदा या उत्सवात सहभागी व्हायचे होते पण तो योग आला नाही. मात्र या दिवशी ते गेले ७, ८ वर्षे शुभेच्छा मात्र जरुर देत. त्यांच्या निधनाने ही उणीव कायम राहणार आहे. यावर्षी कांदीवली येथील कलाकार अभिजित शिंदे प्रात्यक्षिकासाठी येणार आहेत. याशिवाय सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत कविता, चित्रकला, मांडण शिल्पाचा कार्यक्रम होणार आहे. गुलमोहरला एक दिवस अर्पण करण्याची ही कल्पना जितकी अभिनव आहे तितकीच ती सातारकरांमध्ये रुजली आहे, गुरुवारी त्याचा अविष्कार पुन्हा एकदा पहायला मिळेल हे नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा