मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आता सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखील वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आक्रमकपणे आंदोलन केल्याप्रकरणी ११० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात आज सरकारी वकिलांसह सदावर्ते यांचे वकील तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
यावेळी सरकारची बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल झालेले कलम गंभीर असून त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले असा आरोपही केला. तर त्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी बदलून लिहिल्याचा आरोप केला आहे, तसंच सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीसही देण्यात आली नाही, असा दावा केला.
सदावर्ते त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हते, ते मॅट कोर्टात होते, तसंच आंदोलनात घरात घुसून आंदोलन करा वगैरे कुठेही बोललो नाही, असंही वासवानी यांनी सांगितलं. तर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील संदीप गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना सांगितलं की कोर्टाने या कर्मचाऱ्यांचा उद्देश समजून घेतला पाहिजे. एसटी कर्मचारी आरोपी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत, ते आंदोलक आहेत, गेल्या पाच महिन्यांपासून घरदार सोडून ते आंदोलनाला बसले आहेत, असा युक्तिवाद केला.
या प्रकरणी कोर्टातल्या युक्तिवादाबद्दल माध्यमांशी बोलताना सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, “आरोपीचे सीडीआर रेकॉर्ड्स जे पोलिसांनी तपासले, त्यातून त्यांना बरीच माहिती मिळाली. तसंच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले, त्यातून असं निष्पन्न झालं की यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून ५५० घेतले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की वकील म्हणून आम्ही कोणाकडून एक रुपयाही फी घेतलेली आहे. पण साक्षीदारांचं असं म्हणणं आहे की ५५० रुपये प्रत्येकी म्हणजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी १ कोटी ८० लाख रुपये त्यांनी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेले आहेत. ते पैसे कुठे गेले, त्यात वाटेकरी कोण कोण याचा तपास पोलिसांना करायचा आहे. यात कोणाच्या तरी वाट्याला पैसे गेलेले आहेत, असा पोलिसांना संशय़ आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडे असलेल्या सीडीआरमध्ये नागपुरचा एक फोन दिसत आहे. सदरील व्यक्तीला शोधून काढून त्याने का फोन केला, काय बोलणं झालं, याचा पोलीस तपास करत आहेत. त्या व्यक्तीने नंतर ‘पत्रकारांना पाठवा’ असा मेसेजही केला, त्यामुळे ही व्यक्ती कोण हे पोलिसांना शोधून काढायचं आहे.”