प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याचं म्हणत एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मुद्द्यावरून आता राजकारणदेखील तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“जे लोक आंदोलन करत आहेत, ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. काही बोटावर मोजण्याइतके आणि एसटीमधून निलंबित करण्यात आलेली लोक आंदोलन करत आहेत. नोकरीवर असताना प्रदीर्घ काळ रजा घेऊन मजा मारणारी ही लोक आहेत”, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

हेही वाचा – ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?

“ज्या कृती समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे, ती कृती समिती नाही, कीडे समिती आहे. ही लोक पाच टक्के मलाई खाणारे लोक आहेत. यांनी लिहून देताना, धरणे आंदोलन करत असल्याचं लिहून दिलं आहे. मात्र, एसटीतील कष्टकऱ्यांना संप करण्यास सांगण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर उठलेली ही बांडगुळं आहेत”, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली.

पुढे बोलताना, “आम्ही आंदोलन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातव्या वेतन आयोगाबाबत विचार करण्यास सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यालाच त्याची कार्यवाही पूर्ण केली होती. मात्र, कृती समितीने अडचणी आणून ती होऊ दिली नाही. कारण त्यांना बीओटी तत्वावरील करारातील पाच टक्के मलाई खायची होती”, असा आरोपाही त्यांनी केला.

हेही वाचा – एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर… कृती समिती काय म्हणते…

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या विधानावरूनही त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं. “सुप्रिया सुळे म्हणतात, की आम्ही एसटी गावावापर्यंत पोहोचवू, पण जेव्हा १२४ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तेव्हा सुप्रिया सुळे कुठं होत्या? तेव्हा त्या संसदेत का बोलल्या नाहीत? तेव्हा शरद पवार शांत का होते? मुळात ही जबाबदारी न स्वीकारणारी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारी माणसं आहेत. सध्या जे आंदोलन सुरू आहे, ते राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा हात आहे”, असेही ते म्हणाले.